अकोला: जिल्ह्यातील कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत असतानाच विविध जुन्या व्याधींमुळे अनेक रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येत आहेत. अशा रूग्णांसाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवारी अकोल्यातील ‘टेलीआयसीयु’ सुरू करण्यात आले. शुक्रवारी आयोजित आॅनलाईन कार्यक्रमांतर्गत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याहस्ते टेली आयसीयुचे उद््घाटन करण्यात आले. गत तीन महिन्यांपासून तांत्रिक अडचणींमुळे अकोल्यातील टेली-आयसीयु रखडले होते.मेडीस्केप या डॉक्टरांच्या फाऊंडेशनमार्फत राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये ‘टेली आयसीयु’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या अनेक रूग्णांमध्ये दुर्धर आजार असल्याचे गत काही महिन्यात आढळून आले. या रूग्णांना योग्यवेळी तज्ज्ञ विषय तज्ज्ञ उपलब्ध व्हावेत, या अनुषंगाने ‘हेटी आयसीयु’ महत्त्वाची भूमीका पार पाडणार आहे. त्यानुसार, शुक्रवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आॅनलाईन कार्यक्रमात अकोल्यासह जळगाव येथील टेली आयसीयुचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे प्र. अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राज्यात यापूर्वी मुंबई, ठाणे, सोलापूर, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांमध्ये टेली आयसीयु सुरू करण्यात आले आहे. गत तीन महिन्यांपासून ब्रॉडबँड जोडणी अभावी सर्वोपचार रूग्णालयातील टेली आयसीयु रखडले होते. टेली आयसीयु सुरू झाल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयु) उपचार सुरू असलेल्या कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेषज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे.
...अखेर अकोल्यातील ‘टेलीआयसीयु’ सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 5:27 PM