तेल्हारा : तालुक्यातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करीत शहरातील विशाल नांदोकार या युवकाने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी नागरिकांनी तालुक्यातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवित मंगळवारी दि.२९ जून रोजी तेल्हारा तालुका बंदचे आवाहन केले होते. या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिष्ठाने बंद केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट होता.
तालुक्यातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून, यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी आंदोलने केली ; मात्र शासनाला जाग आली नसून, रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. अखेर रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी करीत शहरातील युवक विशाल महादेवराव नांदोकार याने बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणाला नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. तालुक्यातील रस्त्यांच्या प्रश्नाबाबत मागण्या मंजूर व्हाव्या, यासाठी मंगळवारी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी बंदचे आवाहन केले होते. या बंदला नागरिकांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित प्रकार घडू नये, याकरिता ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ताफा तेल्हारा शहरांमध्ये तैनात झाला होता. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही.
---------------
आज बांधकाम उपविभागीय कार्यालयाला घेराव
बुधवार, ३० जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला घेराव आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये तेल्हारा शहरातील व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच उद्या दि. १ जुलैला शहरासह तालुक्यात रस्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा नागरिकांनी यापूर्वी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.