तेल्हारा: स्थानिक गाडगेपुरा भागात गत पंधरा दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला असून, पावसामुळे हा खड्डा वाढत चालला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याबाबत माहिती देऊनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने गाडगेपुरा येथील नागरिकांनी दि.२६ जुलै रोजी नगरपालिकेत धडक देत अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी अपघातास कारणीभूत ठरणारा खड्डा बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली.
जुन्या शहरातील गाडगेपुरा येथे पंधरा दिवसांपूर्वी एक मोठा खड्डा पडला आहे. खड्ड्याच्या बाजूलाच सार्वजनिक नळ असल्याने तेथे पाणी भरणाऱ्यांनी गर्दी असते. खड्ड्यात एखाद्याचा पाय घसरून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खड्डा तत्काळ बुजविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने, अखेर गाडगेपुरा भागातील नागरिकांनी नगरपालिकेत धाव घेऊन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालीत खड्डा तत्काळ बुजविण्याची मागणी केली आहे.
यावेळी तेल्हारा विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर, बबलू ठाकुर, कैलाश सातव, बजरंग गाडगे, रवि इंगळे, वसंत हागे, रवि राऊत, रितेश बरडे, भगत मलिये, विठ्ठल भिवटे, नीलेश गोरले, अक्षय ठाकूर, उकर्डा नागोलकार, प्रल्हाद ढेंगे, पवन भिवटे, गणेश इंगळे आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता म्हस्के यांनी उद्यापासून खड्डा बुजविण्याचे काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले.