दुकाने बंद करण्यासाठी पाेलीस विभागाचे वाहन फिरत असताना थाेड्यावेळपर्यंत दुकानाचे शटर खाली ओढायचे व नंतर पुन्हा उघडायचे, असा प्रकार शहरात दिसून आला.
या दुकानांवर लक्ष कोणाचे?
अकोला शहरातील टिळक रोड, रिंग रोडवरील रस्त्यावरील कमर्शियल काॅम्प्लेक्समधील दुकाने ४ वाजता बंद करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. ४ वाजतानंतर पाेलीस विभागाचे कर्मचारी फिरताना दिसतात. याकरिता जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे अधिकार महानगरपालिकेला दिले आहेत. तरी काही दुकाने अर्धशटर उघडे दिसून येत आहेत.
दुकानाबाहेर उभा राहतो व्यक्ती!
काेराेना संसर्ग पाहता ४ वाजता दुकाने बंद करण्याची लगबग व्यावसायिकांमध्ये दिसून येते; परंतु काही दुकानांबाहेर एक व्यक्ती उभा राहून काय हवे, याची विचारणा करून साहित्य देत असल्याचे चित्र अकोला शहरात दिसून येत आहे. पाेलिसांचे वाहन ४ वाजतापासून शहरात सायरन वाजवत फिरत असताना दुकाने बंद करण्याची लगबग काही दुकानदार दाखवितात. गाडी पुढे निघून गेल्याबराेबर पुन्हा दुकाने सुरू ठेवण्यात येतात.
हे घ्या पुरावे...!
कमर्शियल काॅम्प्लेक्स
अकोला येथील गांधी रोडवर असलेल्या कमर्शियल काॅम्प्लेक्समध्ये मोबाइल व कपड्यांची दुकाने ४ नंतरही सुरू होती. तर काही दुकाने अर्धशटर उघडून सुरू असल्याचे ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीवरून दिसून आले.
पंचायत समिती मार्ग
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय ते पंचायत समिती मार्गावर असलेले गॅरेजचे दुकान ४.३० वाजताही पूर्णशटर उघडे दिसून आले. यामध्ये काही ग्राहक असल्याने हे दुकान उघडे हाेते.
काेराेना संसर्ग अद्याप संपला नाही तर कमी झाला आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमांचे उल्लंघन हाेत असेल तर उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध संबंधित विभागाकडून कारवाई केली जात आहे.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.
कोरोनाकाळात दुकानांवरील कारवाई
पहिल्या लाटेत ४७०
दुसऱ्या लाटेत ६३८