- गोवर्धन गावंडे
हिवरखेड: सातपुडा पर्वतराईला धोका पोहोचू नये म्हणून मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या हिवरखेड-तुकईथड मार्गावर अकोला, अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर पाषाण ‘तेल्यादेव’ म्हणून प्रसिद्ध आहे. तेल्यादेवाला तेल आणि तंबाखूजन्य पदार्थांचा अभिषेक करून श्रद्धाळू परंपरा जोपासत आहेत तर तेल्यादेव सातपुडा रक्षक म्हणून आपली भूमिका बजावत आहे.
असंख्य आदिवासी बांधव तसेच व्यापारी याच मार्गाचा वापर अमरावती जिल्हा तसेच मध्य प्रदेश राज्यात जाण्यास करतात. या ठिकाणावरून ये-जा करणारे प्रवासी आपल्या जवळील तेल व तंबाखूजन्य पदार्थ बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा या ठिकाणी अर्पण करून रवाना होतात. ही प्रथा फार प्राचीन आहे. तेल्यादेवला तेल, तंबाखू, विडी चढवल्याने जंगलातील पुढील मार्गात अडथडा येत नाही किंवा कुठला धोका होत नाही, असा समज या भागांतील नागरिकांचा आहे. जुन्या काळात दळणवळणासाठी ज्या वेळी बैलगाडीशिवाय कुठलीच वाहन सुविधा नव्हती तेव्हापासून ही प्राचीन प्रथा आदिवासी समुदायासह प्रवासी अंधश्रध्देतून आजही पालन करीत आहेत. बिडी, सिगारेटचा वापर सातपुडा जंगलात केल्याने अनेकदा आग लागून वनराईचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. परंतु या मार्गावरील प्रवासी तेल्यादेव या ठिकाणावर बिडी व इतर तंबाखूजन्य पदार्थ अर्पण करत असल्याने आगीच्या घटनांना आळा बसत आहे. या प्रथेमागे अंधश्रद्धा असली तरी यामुळे अभयारण्यातील वातावरण प्रदूषित होण्यापासून वाचत आहे, असे मत वन्यप्रेमी तुलसीदास खिरोडकार यांनी व्यक्त केले आहे. अज्ञानातून अनेक वेळा अंधश्रद्धा निर्माण होत असते. त्यातून अनेकांची फसवणूकसुद्धा होते; परंतु तेल्यादेवमागची श्रद्धा कुणाला फसवणारी नाही. तर विडी, आगपेटी, तंबाखू अशा वस्तू तेल्यादेवला अर्पण केल्याने तेथून ये-जा करणाऱ्यांना सुरक्षितता वाटत असल्याचे मत आदिवासी बांधवांनी व्यक्त केले.
तेल्यादेवाच्या श्रद्धेतून कुणाची फसवणूक होत नाही, त्यामुळे अंनिसचाही याला आक्षेप नाही. उलट वनराई वाचविण्याबरोबरच व्यसनमुक्तीसाठी तेल्यादेवचा जास्त उपयोग झाला पाहिजे.
- अशाेक घाटे, अंधश्रध्दा निर्मूलन समिती
वनराईची सुरक्षितता अबाधित
तेल्यादेवापुढे विडी, आगपेटी, तंबाखू अशा वस्तू अर्पण केल्याने नकळत वनराईचीसुद्धा सुरक्षितता अबाधित राहते, अशा या तेल्यादेवावर व्यसनमुक्तीसाठी जरी श्रद्धा ठेवली तर खऱ्या अर्थाने ही श्रद्धा सार्थकी ठरू शकेल.