अकोला: पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात किमान तापमान सरासरी ५ अंशाने घटले असून, वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. विदर्भात येत्या १, २ व ४ फेब्रुवारी रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. गत पंधरवड्यात हे किमान तापमान १६ अंश होते.वऱ्हाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील किमान तापमानात सारखा चढ-उतार सुरू आहे. डिसेंबर महिन्यात एक-दोन दिवस सोडले, तर अद्याप अपेक्षित थंडी पडली नाही. डिसेंबर २०१९ मध्ये २८ व २९ डिसेंबर रोजी सरासरी किमान तापमान ७ अंश होते. त्यानंतर १० आणि ११ जानेवारीला ९.७ आणि ८.४ पर्यंत हे किमान तापमान कमी झाले. या हिवाळा ऋतूमध्ये केवळ चार दिवस थंडी पडली. तेव्हापासून ३० जानेवारीपर्यंत किमान तापमान सरासरी १६ होते. आता अचानक वातावरणात गारठा वाढला असून, किमान तापमान घटून सरासरी ११ अंशापर्यंत खाली आहे. हा गारठा जो आहे, तो हवेच्या वेगामुळे वाढला आहे. देशाच्या उत्तर-पूर्व भागात बर्फवृष्टी होत आहे. त्या भागाकडून महाराष्टÑाकडे हे वारे वाहत असल्याने किमान तापमानात घट झाली असल्याचे हवामानशास्त्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे.गत चोवीस तासांत शुक्रवार, सकाळी ८.३० वाजतापर्यंत राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अकोला जिल्ह्यात हेच किमान तापमान ११.२ होते. अमरावती ११.२, बुलडाणा ११.६, चंद्रपूर १२.६, नागपूर १२.२, वर्धा १२.०, यवतमाळ १३.० तसेच वाशिमचे किमान तापमान १२.० होते.दरम्यान, १ ते ४ फेब्रुवारीपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. या वातावरणाचा मात्र पिकावर प्र्रतिकूल परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.