अकोला : उन्हाळा संपायला अजून अडीच महिना बाकी आहे. दररोज वाढत चाललेल्या उन्हाच्या पाऱ्याने अंगाची काहिली होऊ लागली आहे. बुधवारी १० मार्च रोजी अकोल्याचे तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. वाढत्या तापमानामुळे अकोलेकर त्रस्त झाले आहे. यामुळे आगामी काळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील १५ दिवसांपासून थंडीची तीव्रता कमी होत आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाची तीव्रता सायंकाळी ५ वाजेपर्यंत कायम राहत आहे. अशातच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच इतर आजारही डोकेवर काढत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागत आहे. घरातील पंखे गरगरू लागले असून, एसी नॉर्मल मोडवर सुरू झाले आहेत. बुधवारी अकोल्याचा पारा ३९ वर पोहोचला होता. येत्या आठ ते पंधरा दिवसांत तापमान ४०च्या वर जाण्याची शक्यता आहे. या उकाड्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
थंड पेय व फळ सेवन करा
उन्हाळ्यातल्या उष्णतेचे नियमन करण्यासाठी, घामामुळे शरीरातील कमी झालेला जलांश पुन्हा भरून येण्यासाठी शरीराची पाण्याची किंवा काही थंड पेय प्यायची ओढ जास्त असते. या थंड पेयासोबत फळांचे सेवनही लाभदायी आहे.
जिल्ह्यात पावसाचे संकेत
१० ते १४ मार्च दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, तसेच एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभाग नागपूर वर्तविली आहे. जिल्ह्यातील गावामधील नागरिकांनी सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.