अकोला : या वर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेतच, शिवाय डोंगराळ भागातील ओढे व धबधबेही ओसंडून वाहत आहेत. पावसाने वातावरण आल्हाददायक झाल्याने सुट्यांच्या दिवशी पर्यटकांची पावले निसर्गाकडे वळत आहेत. अकोला जिल्ह्यात पातूर व अकोट तालुक्यातील डोंगराळ भागात धबधबे आहेत. सध्या या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी दिसून येते. धबधब्यांमध्ये जलक्रीडेचा आनंद घेतानाच सेल्फी घेण्याचा माेह अनेकांना आवरत नाही. तथापि, स्वत:च्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास सेल्फीचा हा मोह जीवावरही बेतू शकतो. निसरड्या खडकांवरून पाय घसरून कपाळमोक्ष होण्याची भीती असल्याने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. पर्यटकांनी सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे असले, तरी बहुतांश ठिकाणी तसे होताना दिसत नाही.
पर्यटनाला जा, पण काळजी घ्या !
धोदानी धबधबा
पातूर तालुक्यातील डोंगराळ भागात हा छोटा धबधबा आहे. दुर्गम भागात असल्यामुळे या धबधब्यावर फारसे पर्यटक दिसत नाहीत. माळराजुरा पर्यटन केंद्रापासून गोंधळवाडी गावाकडे जाताना हा धबधबा आहे. मोर्णा नदीचा एक प्रवाह खडकावरून खाली उतरतो. या ठिकाणी हौशी पर्यटक येतात.
सुलईनाला/ सूर्या धबधबा
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी मेळघाट अभयारण्यात हा धबधबा आहे. भौगोलिकदृष्ट्या हा धबधबा अमरावती जिल्ह्यात येत असला, तरी अकोट शहरापासून जवळ असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात. अकोट येथून पोपटखेड मार्गे खटकाली टी पाॅइंटजवळ सुलईनाला किंवा सूर्या धबधबा आहे.
धारगड
अकोट तालुक्यात सातपुडा डोंगरात हा धबधबा आहे. या ठिकाणी गुहेत शिवलिंग असून, दरवर्षी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविक मोठ्या संख्येने येतात. कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून यात्रा बंद आहे. नरनाळा किल्ल्याला भेट देणारे पर्यटक आवर्जून धारगडला भेट देतात. या ठिकाणाला पर्यटनापेक्षा धार्मिक महत्त्व अधिक आहे.
धोक्याची सूचना देणारे कोणीही नाही
पातूर तालुक्यातील धोदानी धबधबा दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी वनविभागाचा कोणीही कर्मचारी दिसून येत नाही. तसेच या ठिकाणी खबरदारी घेण्याचा इशारा देणारे फलकही नाहीत. सुलई धबधबा मेळघाट अभयारण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी जाणाऱ्यांची चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांकडून चौकशी केली जाते. या धबधब्याचा इशारा देणारी फलके असली तरी त्याकडे कुणी फारसे लक्ष देत नाही.
जबाबदारी कुणाची?
पर्यटनस्थळी विशेषत: उंच डोंगरात असलेल्या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. अपघात होऊ नये यासाठी वनविभागाकडून नागरिकांना सूचना दिल्या जातात. परंतु, अनेकदा नागरिकांकडून त्याचे पालन होत नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.