अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात तातडीने मदत देण्याबाबत शुक्रवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची दहा प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण १६ शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी शेतकरी आत्महत्यांची दहा प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड तांडा येथील सुरेश धर्मा राठोड, पातूर तालुक्यात उमरा येथील प्रमोद सुखदेव चिपडे, तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील श्याम विठ्ठलराव वानखडे, वाडी अदमपूर येथील दयाराम मोतीराम भोंगळ, पातूर तालुक्यातील चतारी येथील दिनकर वामन सदार, अकोला तालुक्यातील भौरद येथील विजय राघो श्रीनाथ, दुधलम येथील रामेश्वर रूपराव महल्ले, पातूर तालुक्यातील गावंडगाव येथील श्रीकांत रोहिदास राठोड, अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे येथील दिलीप यशवंत वानखडे व बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड तांडा येथील फकिरा मेधा राठोड इत्यादी दहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला समितीचे सदस्य अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शिवाजीराव देशमुख, डॉ. बाबूराव शेळके, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम व संबंधित अधिकारी उपस्थित होते.