लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील पोळा चौक परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस करीत आठ ते दहा जणांवर हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार, २१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत कुत्र्याने एका तीन वर्षीय चिमुकल्याच्या गालाचा लचका तोडला असून, त्याच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास जुने शहरातील पोळा चौक परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या लोकांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. कुत्र्याच्या अशा प्रकारच्या हल्ल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रस्त्यावरून जाणाºया दुगाने दाम्पत्याचा तीन वर्षीय सिद्धांत विनोद दुगाने नामक चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला चढविला.या हल्ल्यात कुत्र्याने चिमुकल्याच्या उजव्या गालाचा लचका तोडला. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. संतापाच्या भरात परिसरातील नागरिकांनी कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला; परंतु कुत्र्याने तेथून पळ काढला. जखमी चिमुकल्याला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या गालाची शस्त्रक्रिया करून प्लास्टिक सर्जरी करावी लागणार असल्याचे सांगितले; परंतु त्यासाठी येणारा खर्च परवडणारा नसल्याने येथील डॉक्टरांनी बाहेरून तज्ज्ञ डॉक्टर बोलावून चिमुकल्याची शस्त्रक्रिया केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोंडवाडा विभाग निष्क्रियप्राप्त माहितीनुसार, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या कोंडवाडा विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. मुख्य रस्त्यावर कुत्र्यांसह इतर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असताना महापालिकेचा कोंडवाडा विभाग मात्र निष्क्रिय झाला आहे.
भांडपुरा चौकातही कुत्र्यांचा हैदोसजुने शहरातील भांडपुरा चौकात उघड्यावरच मांस विक्री केली जाते. त्यामुळे या ठिकाणी कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून, त्याचाही हैदोस यापूर्वी बघायला मिळाला होता. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.