वरुर जऊळका : अकोट वन विभागांतर्गत येणाऱ्या वरुर जऊळका येथे २0 एप्रिलला सायंकाळच्या सुमारास एका युवकावर दहा माकडांनी हल्ला करून जखमी केले. गावामधील ही चवथी घटना असून, यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत.येथील युवक सतीश काठोळे यांच्या राहत्या घरावर माकडे आली होती. या युवकाने माकडांना पळविण्याचा प्रयत्न केला असता, एका माकडाने युवकावर उडी घेतली. या युवकाने त्याचा प्रतिकार केला असता पुन्हा आठ ते नऊ माकडांनी युवकाच्या अंगावर उड्या मारुन अचानक हल्ला केला. या युवकाने जोरामध्ये नागरिकांना आवाज दिला. नागरिक पळत आल्यानंतर माकडांनी पलायन केले. या युवकाला सहा ठिकाणी माकडांनी चावा घेतला आहे. युवकाचे दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचल्याची गावात चर्चा होत आहे. लगेच नागरिकांनी या युवकास अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती ठीक आहे. यानंतर यांनी संबंधित वन विभागाला लेखी स्वरूपात माहिती दिली. २१ एप्रिल रोजी अकोट वन विभागाचे कर्मचारी गावामध्ये दाखल होऊन माकडांच्या टोळक्यातील एका माकडास पकडण्याचा मोठा प्रयत्न केला असता, त्यांना यश मिळाले नाही. या गावातील ही चवथी घटना असून, या आधी तीन युवकांवर असाच हल्ला माकडांनी केला होता. मोठ्या प्रमाणात माकडांचे टोळके गावामध्ये येवून घरामध्ये शिरत आहेत. या माकडांना पळविण्याचा प्रयत्न केल्यास माकडे नागरिकांवर हल्ला करीत आहेत. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे, तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)