कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढत आहे. विशेषत: ऑक्सिजनवरील रुग्णांना नियमित ऑक्सिजन मास्क लावावा लागतो. त्याची नियमित स्वच्छता होत नसल्याने काळी बुरशी तयार होण्याची शक्यता नाकराता येत नाही. यासाेबतच ऑक्सिजन यंत्रणेतील फ्लो मीटरच्या बॉटलमधील पाणी नियमित बदलणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजन यंत्रणेतील हे पाणी नियमित बदलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी जीएमसी प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. त्याचसोबत कोविडच्या रुग्णांनीही विशेष खबरदारी घेत नाक, तोंड आणि कानाची नियमित स्वच्छता राखावी, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.
रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची तयारी
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातर्फे या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या रुग्णांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
जिल्ह्यातील स्थिती
म्युकरमायकोसिसचे एकूण रुग्ण - १६
उपचार सुरू असलेले रुग्ण - ६
बरे झालेले रुग्ण - १०
रुग्णांनी काय काळजी घ्यावी
रुग्णांसह सर्वसामान्यांनी नियमित नाकपुड्या स्वच्छ ठेवाव्यात.
नाकातील त्वचा कोरडी व्हायला नको.
टाळूवर काही चिटकून राहायला नको.
तोंड स्वच्छ ठेवावे.
डोळे कोरडे पडू देऊ नका.
ऑक्सिजन मास्क बदलण्याची गरज
कोविडसह इतर गंभीर रुग्णांना अनेक दिवस ऑक्सिजन मास्क लावण्यात येतो. हाच मास्क दुसऱ्या रुग्णाला लावण्यात येतो. या मास्कची नियमित स्वच्छतादेखील होत नाही. त्यामुळे एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णालाही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा धोका लक्षात घेता ऑक्सिजन मास्क बदलण्याची गरज आहे.
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून येत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता, सर्वोपचार रुग्णालयातर्फे विशेष खबरदारी घेतली जात आहे. कोविड रुग्णांसह सर्वसामान्यांनी म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी नाक, कान आणि घसा, दात स्वच्छ ठेवावे.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला