अकोला : गत काही दिवसांपासून हवामानात झालेल्या बदलांमुळे विदर्भात कपाशीवर सर्वत्र बोंडअळीवर प्रादुर्भाव आढळून येत आहे. कपाशीवर जवळपास १० टक्के बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांनी पीक सर्वेक्षणासह कीड व्यवस्थापनाबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागातर्फे शनिवारी करण्यात आले. कृषी विद्यापीठाच्या माहितीनुसार कीटकशास्त्र विभागात दर महिन्याच्या १ व १६ तारखेला विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कीटकशास्त्रज्ञांची पिकावरील कीड परिस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात येत असते. या बैठकीत विदर्भातील सर्व संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे व कृषी महाविद्यालय येथील कार्यरत कीटकशास्त्रज्ञ त्यांना नेमून दिलेल्या तालुक्यात तेथील कृषी अधिकार्यांसोबत सर्वेक्षण करून कीड परिस्थितीबाबत माहिती सादर करतात. त्यानुसार १६ ऑक्टोबर रोजी विदर्भातील सर्व कीटकशास्त्रज्ञांनी आढावा घेण्यात आला. त्यानुसार, बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे समोर आले.
बोंडअळीच्या वाढीसाठी वातावरण पोषक
सप्टेंबरच्या दुसर्या पंधरवाड्यात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव ५ टक्क्यांपर्यंत होता. परंतु आता त्यात वाढ होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात तो १० टक्के झाला. सद्यस्थितीत वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे. त्यामुळे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे करा उपाय
कपाशी पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमान सापळे लावावे.
सतत तीन दिवस या सापळ्यांमध्ये आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावे.
फुलावस्थेत दर आठवड्याने पिकामधे मजुरांच्या सहायाने डोमकळ्या शोधून नष्ट कराव्या.
पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझॉडिरेक्टीन ०.०३ (३०० पीपीएम) ५० मिली किंवा ०.१५ टक्के (१५०० पीपीएम) २५ मिली प्रति १० ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आठवड्यात एकरी शेतीचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील मध्यम आकाराचे मध्यम पक्व झालेले बाहेरून किडके नसलेले एक बोंड असे २० बोंडे तोडून घ्यावे. त्यामधील कीडक बोंड व अळ्यांची संख्या मोजून, ती दोन किडक बोंड किंवा दोन पांढुरक्या किंवा गुलाबी रंग धारण करीत असलेल्या अळया आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी (५ ते १० टक्के) समजून रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.