अकोला: मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गुन्ह्यात सुनेसोबत अतिप्रसंग करणाऱ्या सासऱ्यास शुक्रवारी दहा वर्षांची शिक्षा व विनयभंग करणाऱ्या दिरास दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. विद्यमान अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस.जे. शर्मा यांच्या न्यायालयाने शुक्रवारी ही शिक्षा ठाेठावली.
या प्रकरणातील हकीकत अशी की, ६४ वर्षीय आरोपी सासऱ्याने त्याची सून घरी एकटी असताना तिच्यासोबत अतीप्रसंग केला व ही बाब कोणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपी २९ वर्षीय दिर हा त्याची वहिनी घरी एकटी असताना तिचा विनयभंग करीत असे. पीडिता माहेरी गेल्यावर तिने हा प्रकार तिच्या आईस सांगितला. त्यानंतर मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली. आरोपींवर हा खटला चालवण्यात आला. या प्रकरणात सरकारतर्फे एकूण सहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्यात. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील किरण खोत व ए.पी. गोटे यांनी बाजू मांडली. प्रकरणाचा तपास पीएसआय दीपक भगवान इंगळे यांनी केला. पैरवी म्हणून संतोष आंबीलवादे व प्रिया गजानन शेंगोकार यांनी सहकार्य केले. साक्ष पुरावा ग्राह्य धरून आरोपी सासरा व दिरास शिक्षा सुनावण्यात आली.
...अशी सुनावली शिक्षाआराेपी सासऱ्यास भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३७६ (दोन)(के) मध्ये दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. साेबतच कलम ५०६ मध्ये एक वर्ष सक्त मजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी दिरास कलम ३५४ अन्वये दोन वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास. कलम ३५४-ए मध्ये एक वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास. कलम ५०६ मध्ये एक वर्ष सक्त मजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी दिरास चांगली वागणुकीच्या हमी बाँडवर साेडण्यात आले.