अकोला : अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनच्या बहुप्रतीक्षित उड्डाण पुलाच्या कामाची निविदा अखेर मंजूर झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली. २०१५ मध्ये या उड्डाण पुलाच्या बांधकामाचे उद्घाटन देशाचे केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मोठ्या थाटात केले होते; मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. साडेतीन वर्षांनंतर या कामाच्या निविदेला मंजुरी मिळाली आहे.अशोक वाटिका चौकापासून अकोला रेल्वे स्टेशनपर्यंत साडेतीन किलोमीटर अंतरापर्यंत हा उड्डाणपूल विस्तारला जाणार आहे. अमरावती रोड आणि दुसरीकडे दक्षता नगर मार्गाकडे जाण्यासाठी या उड्डाण पुलास मार्ग राहतील. दोन फ्लाय ओव्हर, एक अंडरपास आणि सर्व्हिस रोडचा यामध्ये समावेश आहे. अशोक वाटिकेपासून निघणाऱ्या या उड्डाण पुलास टॉवरच्या अलीकडे दोन्ही बाजंूनी फ्लाय ओव्हर जोडला जाईल. त्यानंतर अकोला जिल्हा न्यायालयाच्या पुढे हा उड्डाणपूल लँड होईल. मध्यवर्ती बसस्थानकाजवळ अंडरपास दिला जाणार असून, उड्डाण पुलास सर्व्हिस रोड दिला जाणार आहे.अकोला शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीला पर्याय म्हणून उड्डाणपूल बांधण्याचा पर्याय समोर आला होता. त्यानंतर अशोक वाटिका ते अकोला रेल्वे स्टेशन मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन झाले. ३१ मार्च २०१५ रोजी अकोला दौºयावर असलेल्या केंद्रीय बांधकाम मंत्र्यांनी अशोक वाटिका चौकात उद्घाटन केले होते. ३१ मार्चपासून रेंगाळत पडलेल्या या उड्डाण पुलावर विरोधकांनी टीका-टिपणी केली होती. दरम्यान, पुलाच्या बांधकामाची निविदा काही महिन्यांआधी काढली गेली असून, त्यास मंजुरी मिळाल्याची घोषणा शनिवारी पालकमंत्री डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
हरियाणाच्या जान्डू कंपनीला दिला कंत्राट!हरियाणा राज्यातील हिस्सार येथील जान्डू कन्स्ट्रक्शन कंपनीला अकोल्यातील उड्डाणपूल बांधकामाचा कंत्राट दिला गेला आहे. १६३.९८ कोटींच्या खर्चातून उड्डाण पुलाचे बांधकाम केले जाणार आहे. प्रत्यक्ष काम सुरू केल्यापासून दोन वर्षांच्या आत उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण करावे लागणार आहे.
अकोल्यातील उड्डाण पुलाच्या बांधकाम निविदेला मंजुरी मिळाली असून, वर्क आॅर्डर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच या कामाला अकोल्यात सुरुवात होणार आहे.-विलास ब्राह्मणकर, प्रकल्प प्रमुख अभियंता, अमरावती.