अकोला:‘डिजीटल इंडिया’ कार्यक्रमांतर्गत राज्यातील तलाठी व महसूल मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटाॅप देण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीतून लॅपटाॅपची खरेदी करण्याकरिता राज्यातील विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संगणकीकृत सात बारा, फेरफार नोंदी, नमुना ८ अ , विविध प्रकारचे दाखले ऑनलाइन पध्दतीने देण्याचे काम तलाठी आणि महसूल मंडळ अधिकाऱ्यांकडून करण्यात येते. त्यासाठी पाच वर्षांपूर्वी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटाॅप देण्यात आले होते; परंतु त्यापैकी बहुतांश लॅपटाॅप आता कालबाह्य आणि नादुरुस्त झाल्याने, जुन्या लॅपटाॅपव्दारे ऑनलाइन कामकाज करणे तलाठी व महसूल मंडळ अधिकाऱ्यांना कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर तलाठी व महसूल मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटाॅप देण्यासाठी शासनामार्फत निधी मंजूर करण्यात आला आहे. उपलब्ध निधीतून मागणीनुसार तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटाॅप उपलब्ध करण्यासाठी लॅपटाॅप खरेदीकरिता राज्यातील विविध जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटाॅप देण्यात येणार आहेत.
महसूल विषयक विविध प्रकारचे ‘ऑनलाइन’ कामकाज करण्यासाठी गरज आणि मागणी असलेल्या जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटाॅप देण्यात येणार आहेत. त्यासाठी लॅपटाॅप खरेदीकरिता निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला.