डॉ. किरण वाघमारे/अकोलामहात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत सहभागी होऊन आपले गाव तंटामुक्त करणार्या ग्रामपंचायतींना निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार राज्यातील १ हजार ७४१ गावांना ४६ कोटी रुपये पुरस्कार स्वरुपात मिळणार आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम गत सहा वर्षांपासून सुरु आहे. २00८ साली तंटामुक्त गाव मोहिम अभियानाला सुरुवात झाली. १५ ऑगस्ट २0१३ पासून सुरु झालेले या मोहिमेचे सहावे वर्ष १५ ऑगस्ट २0१४ रोजी संपले. या वर्षात राज्यातील अनेक गावांनी मोहिमेत सहभाग घेतला. ग्रामसभा घेवून या गावांनी आपला मोहिमेतील सहभाग निश्चित केला. मोहिमेतील तंटामुक्त गाव समितीने भविष्यात तंटे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि गावातील दाखल केलेल्या दिवाणी, महसुली व इतर तंट्यांची माहिती ३0 सप्टेंबर २0१२ पर्यंत संकलीत करावयाची होती. या सर्व बाबींची पुर्तता योग्य पद्धतीने करणार्या गावांना तंटामुक्तीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. १४ ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयानुसार तंटामुक्त गावांचे निकष स्वंयमूल्यमापनानुसार पूर्ण करणार्या गावांचा तंटामुक्त पुरस्काराच्या पुढील टप्प्यासाठी निवड झाली. १ मे २0१३ रोजी ग्रामसभा घेवून गाव तंटामुक्त झाल्याची घोषणा करणार्या गावांचे ५ मे ते ५ जून २0१३ या कालावधीत जिल्ह्यातंर्गत मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात २ हजार १३६ गावे पुरस्कारासाठी पात्र ठरली. २0 जून ते २0 जुलै २0१३ या कालावधीत या गावांचे जिल्हाबाह्य मूल्यांकन करण्यात आले. मूल्यांकन करणार्या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला. या अहवालानुसार राज्यातील १ हजार ७४१ गावे तंटामुक्त पुरस्कारासाठी पात्र ठरली आहेत. यामध्ये ४७ गावे ही २00 पैकी १९0 व त्यापेक्षा अधिक गुण घेवून शांतता पुरस्कारासाठी पात्र झाली आहेत. २00१ च्या जनगणनेच्या निकषानुसार या गावांना लोकसंख्येप्रमाणे ४६ कोटी ५९ लाख ७५ हजार रुपये पुरस्कार स्वरुपात मिळणार आहेत. या निधीचा उपयोग गावाच्या विकासासाठी करता येणार आहे.
तंटामुक्त गावांना मिळणार ४६ कोटी रुपये
By admin | Published: December 02, 2014 11:43 PM