लोकमत न्यूज नेटवर्कआलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. सोमवारीही गावात दिवसभर तणावाचे वातावरण होते. दुपारी शांतता समितीची बैठक घेऊन हा वाद सामोपचाराने सोडविण्यात आला आणि ग्रामपंचायतमध्ये रीतसर ठराव घेऊनच गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स किंवा झेंडे लावायचे याचा निर्णय घेण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. पांढुर्णा गावातही ग्रामपंचायतच्या राजकारणावरून दोन गट पडले आहेत. त्यापैकी एका गटाने रविवारी रात्री गावाच्या प्रवेशद्वारावर महापुरुषाचे फ्लेक्स लावले; मात्र दुसर्या गटातील युवकाने त्यावर आक्षेप घेतला. त्यावरून वाद सुरू झाला. या प्रवेशद्वारावर गेल्या अनेक वर्षांपासून विशिष्ट समाजाचे झेंडे लावण्यात आले आहेत. आता त्याच प्रवेशद्वारावर दुसर्या गटाने महापुरुषाचे फ्लेक्स लावले. त्याला विरोध झाल्याने गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. रात्रीच्या सुमारास आदिवासी, हटकर आणि दुसर्या समाजातील लोक लाठय़ा- काठय़ा आणि शस्त्रे घेऊन आमने-सामने आले. याची माहिती मिळताच चान्नीचे ठाणेदार गजानन खारडे यांच्या नेतृत्वातील पथकाने गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. समयसूचकता दाखवून ठाणेदार गजानन खारडे आणि त्यांचे पोलीस पथक गावात पोहोचल्याने दंगलसदृश निर्माण झालेली परिस्थिती निवळली. सोमवारीही या प्रकरणावरून तणावाची परिस्थिती कायम होती. पातूरचे तहसीलदार रामेश्वर पुरी, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, पातूरचे ठाणेदार खंडेराव, ग्रामसेवक योगेश कापकर, सामाजिक कार्यकर्ते, भारिप-बमसंचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांनी पांढुर्णा गावात सभा घेऊन प्रकरण सामोपचाराने मिटविले. यावेळी प्रवेशद्वारावर फ्लेक्स किंवा झेंडे जे काही लावायचे असेल, त्यासंदर्भात ग्रामपंचायतीमध्ये रीतसर ठराव घेऊन निर्णय घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (वार्ताहर)
बाळापूरमध्ये झेंडा लावण्यावरून तणावबाळापूर : शहरात नगर परिषदेच्यावतीने लावण्यात आलेल्या विजेच्या खांबावर विविध धर्मियांनी आपापले झेंडे लावले होते. त्यामुळे सोमवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरपालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने सर्वच झेंडे काढल्याने तणाव निवळला. बाळापूर शहरात नगरपालिकेच्यावतीने विजेच्या खांब्यावर विविध ठिकाणी वेगवेगळ्य़ा धर्माचे झेंडे काही युवकांनी लावले होते. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. नगरपालिकेचे मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी बाळापूर पोलिसांच्या सहकार्याने शहरात लावलेले सर्वच झेंडे काढून टाकल्याने तणाव निवळल्या गेला.