अकोला: कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा निकालाची टक्केवारीसुद्धा वाढली. परंतु, आता अकरावीमध्ये प्रवेेश घेण्यासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे. परंतु सीईटीची वेबसाइट बंद झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत. सीईटी होईल की नाही, अकरावीत प्रवेश कसा मिळेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दहावीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अकरावी प्रवेशाच्या हालचाली दिसत नाहीत. अकरावीत प्रवेशासाठी शासनाने सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले. परंतु दोन दिवसांतच सीईटीची वेबसाइट बंद केली. त्याचे कारणही समजू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम वाढला आहे. अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतील की सीईटी परीक्षेच्या माध्यमातून होतील. याविषयीची कोणतीच कल्पना विद्यार्थ्यांना नाही. यंदा अकोला जिल्ह्याचा निकाल ९९.९९ टक्के लागला. २५ हजार ६३३ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वांनाच अकरावी प्रवेशाची घाई झाली आहे. परंतु सीईटीची वेबसाइट बंद आहे. सीईटी तयारी कशी करावी, कोणत्या अभ्यासक्रमाच्या आधारावर सीईटीची परीक्षा होणार आहे, याची कल्पना विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे अभ्यास करावा आदी प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहेत.
दहावी विद्यार्थी पास- २५,६३१
अकरावीसाठी एकूण जागा- १८,०००
सीईटी वेबसाइट हँग
सन २०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश प्रक्रिया (सीईटी) परीक्षा २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. दहावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने http//:cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुविधा मंडळामार्फत २० जुलैपासून ते २६ जुलैपर्यंत उपलब्ध करून दिली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ तूर्त बंद करण्यात आले. परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.
सीईटी तयारी कशी कराल?
दहावीची परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नावर असते. परंतु सीईटी परीक्षा ही पर्यायी प्रश्नांवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावीच्या अभ्यासक्रमाची तयारी करावी. पर्यायी प्रश्नांची तयारी करावी. परीक्षेचा धसका घेऊ नये. कारण, ही अकरावी प्रवेशासाठी परीक्षा आहे. यापुढील सर्व परीक्षा पर्यायी प्रश्नांवर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा फायदाच होईल.
-प्रा. ललित काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ