सध्या संचारबंदी असतानाही तालुक्यातील प्रत्येक बॅंकेमध्ये पीकविमा किंवा इतर कामांसाठी लोकांची प्रचंड गर्दी वाढत आहे. पिंजरच्या जिल्हा बॅंकेत तर दररोज चारशे ते साडेचारशेपर्यंत लोकांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. सध्या बॅंकेच्या आवारात लोकांची गर्दी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावला आहे. त्यामुळे मंगळवारी उपविभागीय महसूल अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी बार्शीटाकळी तहसील कार्यालयात बैठक घेतली. तालुक्यातील कोणत्याही बॅंकेमध्ये येणाऱ्यांनी आधी कोरोना टेस्ट करावी. त्यानंतरच त्या व्यक्तीला बॅंकेत प्रवेश मिळेल. अन्यथा प्रवेश मिळणार नाही आणि बॅंकेतील कोणतेही काम होणार नाही. असा अजब निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. बैठकीला उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार गजानन हामंद, बार्शीटकाळीचे ठाणेदार प्रकाश पवार, पिंजरचे ठाणेदार महादेवराव पडघान, बीडीओ किशोर काळबांडे, आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांसह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच उपविभागीय महसूल अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसीलदार गजानन हामंद यांनी तालुक्यातील सर्व दवाखान्यांची पाहणी केली.
आधी कोरोना टेस्ट करा, त्यानंतरच बॅंकेतून विड्रॉल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:23 AM