तेल्हारा:
शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालयात कोरोना टेस्ट करून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, अन्यथा दुकाने सील केली जातील, अशा सूचना व्यावसायिकांना देण्यात आल्या आहेत.
शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शहरातील सर्व दुकाने, हॉटेल व इतर व्यावसायिकांची दुकाने सुरू आहेत. याठिकाणी नागरिकांची रेलचेल सुरूच असते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तहसीलदार राजेश गुरव यांनी शहरातील सर्व दुकानदार ,व्यापारी, हॉटेलमालक इतर व्यावसायिक तसेच बाजार समितीमधील हमाल व कामगारांनी दि.२५ फेब्रुवारी रोजी ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे कोरोना टेस्ट करून प्रमाणपत्र घ्यावे, अन्यथा दुकाने सील करण्याची कार्यवाही तसेच दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश जारी करून याबाबत व्यावसायिकांना सूचना ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आल्या आहेत.