केंद्र व राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथील करीत सर्व प्रकारचे उद्याेग,व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी दिली. काेराेना आटाेक्यात येत असल्याचे पाहून शाळा,कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्यात आली. यादरम्यान, नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले. परंतु या नियमावलीकडे दुर्लक्ष केल्या जात असून त्याचे परिणाम समाेर आले आहेत. लग्न समारंभ,विविध साेहळे व प्रवासादरम्यान नागरिकांची हाेणारी गर्दी लक्षात घेता काेराेेनाचा प्रादूर्भाव वाढल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती सर्वत्र असल्यामुळे शासनाने पुन्हा टाळेबंदीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १६ फेब्रुवारी राेजी जमावबंदी लागू करताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काेराेना वाढत असलेला धाेका ओळखून महापालिका प्रशासनाने मंगळवारी मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काेराेना चाचणीचे आयाेजन केले हाेते.
१०१ जणांची केली चाचणी
मनपाच्या वैद्यकीय आराेग्य विभागाने कर्मचाऱ्यांची अॅन्टीजेन चाचणी केली. १०१ जणांपैकी दाेन जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून ९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. एका कर्मचाऱ्याच्या नाकातील स्त्रावाचे नमुने सदोष असल्याने पुन्हा चाचणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर मुदगल यांनी सांगितले. यावेळी डाॅ.छाया उगले, लॅब तंत्रज्ञ अंकुष धूळ, आभा जाधव, सिमा ढेंगे, स्वाती डांगे, पुनम नांवकार, रिजवान अली आदिंची उपस्थिती होती.