अकोला: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी तक्रारकर्ता व किसनराव हुंडीवाले यांचा मुलगा प्रविण हुंडीवाले यांच्या साक्ष सुरू झाली असून, राज्याचे विशेष सरकारी विधिज्ज्ञ ॲड. उज्वल निकम यांनी मंगळवारी न्यायालयात प्रविण हुंडीवाले यांची सरतपासणी घेतली.
धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये ६ मे २०१९ रोजी दुपारी १२ वाजता समाजसेवक किसनराव हुंडीवाले यांची विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे व साबीर यांनी निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार ॲड. नितीन धूत यांची साक्ष यापूर्वीच आटोपली आहे.
आरोपींच्यावतीने ॲड. चंद्रशेखर जलतारे (नागपूर) यांनी तक्रारकर्ते प्रविण हुंडीवाले यांची उलटतपासणी घेतली असता, त्यात प्रविण हुंडीवाले यांनी, वरील आरोपींनी त्यांच्या वडलांची हत्या केली. त्यावेळी ते घटनास्थळावर उपस्थित असल्याचे सांगितले. परंतु याला आरोपींनी विरोध केला आणि तक्रारकर्ता प्रविण हुंडीवाले हे घटनास्थळावर हजर नसल्याचा दावा न्यायालयासमोर केला आहे. मंगळवारी ॲड. सोमनाथ लढ्ढा (औरंगाबाद) यांनीही हेसुद्धा तक्रारकर्त्याची उलटतपासणी करणार आहेत. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम, जिल्हा सरकारी विधिज्ञ राजेश्वर देशपांडे हे न्यायालयात बाजु मांडत आहेत.
न्यायालयात दाखवली व्हिडिओ क्लिप
तक्रारकर्ते प्रविण हुंडीवाले यांची उलटतपासणी होत असताना, त्यांनी, आरोपींच्या वकीलांना, ते घटनेच्या दिवशी धर्मदाय आयुक्त कार्यालयात उपस्थित असल्याचे सांगितले. आरोपींनी त्यांच्यासमोर त्यांच्या वडिलांची निर्घुण हत्या केल्याचे न्यायालयासमोर सांगितले. परंतु याला आरोपींनी विरोध केला आणि तक्रारकर्ता प्रविण हुंडीवाले हे घटनास्थळी हजरच नव्हते. असा दावा केला. एवढेच नाहीतर तक्रारकर्त्याने ८ मे रोजी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये घटनेची माहिती मिळताच, ते घटनास्थळावर पोहोचल्याचे आरोपींनी सांगितले. तसेच त्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिपसुद्धा न्यायालयासमोर दाखवण्यात आली.