व्यवसाय सुरू, पण मास्कचा विसर
अकोला: जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तू वगळल्यास इतर सर्वच वस्तूंची दुकाने बंद आहेत. त्यामुळे सध्यातरी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवरच ग्राहकांची गर्दी होताना दिसून येत आहे, मात्र यातील बहुतांश व्यावसायिकांकडून मास्कचा वापर होताना दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गायगाव मार्गावर धुळीचे साम्राज्य
अकोला: गायगाव मार्गाचे निर्माणकार्य संथगतीने सुरू रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व धूळ आहे. याचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना होत आहे. या मार्गवर सर्वसाधारण वाहतुकीसह जड वाहतूकही सुरू असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
डासांचा प्रादुर्भाव वाढला
अकोला: वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांचा धोका वाढला आहे. अशातच शहरातील विविध भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरियाचाही धोका वढला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी बाळगण्याचे आवाहन डॉक्टरांमार्फत केले जात आहे.
जीएमसीत रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढली असून यामध्ये अनेक रुग्ण बाहेर गावातील आहेत. अशा रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची सर्वोपचार रुग्णालय परिसरात गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.