राजेश शेगोकार, ऑनलाइन लोकमत
अकोला
नागीण सारख्या चित्रपटांनी साप या प्राण्याविषयी अंधश्रद्धेचे मोठे वारूळ तयार केले आहे त्यामध्ये पुढे अनेक चित्रटपटांनी भर टाकल्यामुळे ‘साप’ अजूनही त्या वारूळातून बाहेर आला नाही. विदर्भात मात्र याच सापावर अर्थात नागावर चक्क स्वतंत्र भजनांचीच परंपरा आहे. ‘ठावा’ नावाने ओळखला जाणारा हा गीतप्रकार विदर्भातील अनेक गावांमध्ये आजही परंपरेने सुरू असून नागाच्या गाण्यावर ठाव्याचा ठेक्यात रात्रभर रंगुन जाणाऱ्या मंडळींसाठी नागपंचमी ही पर्वणीच ठरते.
‘ठावा’ हा प्रकार विदर्भात आढळतो. नागांचे गाणी या लोकप्रकारात गायिली जातात. या लोकप्रकारात गायिल्या जाणाºया लोकसगीतांना वºहाडी बोलीत ‘बाºया’ असे म्हणतात आणि ती गणाºया भक्तांना ‘अरबडी किंवा अरबडे’ , ‘अरबळे’ म्हणतात. ही नागाची गाणे म्हणणारे किंवा नागदेवतांची पूजा करणारे असतात. या लोककला प्रकारात ‘अरबड्यांची’ संख्या निश्चित ठरलेली नसते. तरी सहा-सात लोकांच्या वरच अरबडे सहभागी होतात. अरबड्यांचे वय आणि सामाजिक स्थरही असा निश्चित नाही. वीस वर्षापासून ते मरणाला टेकलेले अरबडे असतात. ‘बाºया’ म्हणताना यांच्यात एकप्रकारे स्फुरण चढलेले आढळते.
विदर्भात आज या लोककला प्रकाराचा प्रयोग नागपंचमी सणाच्या दिवशी रात्री आठ वाजतपासून सुरू होतो. विदर्भातील प्रत्येक गावात ‘ठावा’ होतो.ज्या गावात नागदेवाचे ‘ठाणे’ आहे. म्हणजेच मंदिर आहे, त्या गावात पाच दिवस ‘ठावा’ बसविला जातो तर काही गावात दर सोमवारी ठावा होतो.
ठाव्याततील वाद्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते दुसरीकडे कुठेच वापरण्यात येत नाही. हे वाद्य घरगुती भांड्याच्या सहाय्याने तयार केलेले असते. पाण्यासाठी वापरात असलेला तांब्याचा मोठा गुंड म्हणजेच हंडा व त्यावर तांब्याची नाहीतर पितळचे ताट पालथे ठेवल्या जातो. तो एका हाताने चापट मारून वाजविला जातो तर दुसºया हाताने जाड कडे घेमन वाजवून विशिष्ट नाद निर्माण केला जातो. अशी वाजविणाºयंची संख्या किमान दोन तरी असतेच.यासोबतच काही अरबडे पावा, तुणतुणे वापरताना दिसतात. गाणी किंवा बाºया म्हणण्याचे एक विशिष्ट पद्धत आहे. या लोकप्रकारात सहभागी होणाऱ्या लोककलावंताचे आपसूक दोन गट तयार होतात. एक गट नागांची गाणी म्हणतो तर दुसरा गट त्यांनी म्हटलेल्या ओळी पुन्हा म्हणतात. पहिल्या गटाचे गाणे संपल्यावर दुसरा ‘अरबडी’ गाणे म्हणतो. तेव्हा ज्यांना ते गाणे योग्य प्रकारे ते म्हणणाºयांच्या गटात सहभागी होतात. बाकीचे त्यांची जील ओढतात. या गटाबद्दल निश्चित नियम सांगता येत नाही. मात्र, प्रथम गाणाºयांची संख्या एकापासून तीनपर्यंत आढळते तर त्याला साथ देणाºयांची संख्या ही बाकीचे सर्व. ती काही मोजून वगैरे नसते. नागबाऱ्या म्हणण्याची वेळ ही रात्रीची असते. जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे रात्रीचे आठनंतर चालू होतात. संपूर्ण रात्रभर गाणी म्हटल्या जातात.
नागदेवाच्या मंदिरात कळसाची स्थापना करतात. नऊ ग्रहाची किंवा नऊ धान्याची पूजा करतात. वरीलप्रमाणे नागबाºया म्हटल्या जातात. गळा साफ होण्यासाठी अधुनमधून गूळ खातात. शेवटी नागाची आरती म्हणून प्रसाद वाटतात.
-----------
ही लोकगीतेच
नागबाºयात जी गाणी म्हटल्या जातात ती लोकगीते आहेत. म्हणजे ती समाजाने निर्माण करून एका पिढीपासून दुसºया पिढीपर्यंत चालत येतात.ही लोकगीते दोन प्रकारची आहेत. काही गीतांमध्ये कथा गुंफलेली असल्याने त्या गीतांना कथागीत असे म्हणतात तर काही लोकगीते आहेत.
या कथागीतामध्ये ‘एक राजा असतो. त्याला असाध्य व्याधी असते. तो एक दिवस वारूळात हात घालतो तर सापाच्या पाठीवरचे खांडूक फुटते म्हणून नागदेव प्रसन्न होतो. नागदेवाच्या आशीर्वादाने त्या राजाच्या व्याधी दूर होतो’ अशा कथा गुंफलेल्या असतात.
नागबाऱ्यांची सुरुवात नमनाने होते.
पहिले नमन हो नमन धरतीला
हो नमन धरतीला
दुसरी नमन हो नमन पांढरीला
हो नमन पांढरीला
पांढरीला म्हटल्यानंतर गणपती, हनुमंत, पाची पांडव, साती आसरा, भैरव, नवकुळी नाग इत्यादींना नमन केले जाते.
या गोष्टींचे होते पालन
नागपंचमीच्या दिवशी माती उकरणे निषिद्ध मानतात. त्या दिवशी कोणताच कास्तकार शेतात औत धरत नाही. कोणी निंदन लावत नाही. फार पूर्वी असा एक कास्तकार नागपंचमीच्या दिवशी शेतात नांगर घेऊन जातो. नांगर चालू असताना तासात वारूळ लागते. त्या नांगराच्या फळाने वारूळ फुटते. त्या वारूळात असलेला साप बैलाला दंश करतो. बैलाला पान लागते. तेव्हापासून नागपंचमीला कोणताच कास्तकार शेतात काम करीत नाही.
-----------
लोककलांचा अभ्यास करतांना ‘ठावा’ हा प्रकार विशेष भावला. विदर्भात हा प्रकार सर्वश्रृत असून यामधील गाणी ही परंपरेने चालत आलेली आहे. अनेक ठाव्यांमध्ये सहभागी झालो कुठलाही सामाजिक भेदभाव या लोककला प्रकारात आढळला नाही. म्हणजे या प्रकारात गावात स्थानिक असलेल्या अठरापगड जातीपैकी कोणीही सहभागी होऊ शकतो. या याचे वैशीष्ट आहे. सामाजीक भावना वृद्धींगत करीत ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे विशेष म्हणजे पुढच्या पिढीतही ती सरकत असून आता काही ठिकाणी हंडा व परातीसोबत ढोलकीचाही वापर होतो एवढाच काय तो बदल
डॉ.रावसाहेब काळे
अभ्यासक, लोककला
अकोला