केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबद्दल भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काेराेनाच्या काळात आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडली. त्याचे सकारात्मक परिणाम समाेर आले आहेत. २०१४ पासून ते आजपर्यंत पंतप्रधान माेदी यांनी देशाची अर्थव्यवस्था याेग्यरीत्या सांभाळली असून, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत १३ व्या क्रमांकावर असलेला देश आता ५ व्या क्रमांकावर आल्याचे शिवराय कुळकर्णी यांनी सांगितले. अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, शेतकरी व गरिबांसाठी विविध कल्याणकारी याेजनांवर काेट्यवधी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, प्रसिद्धी प्रमुख गिरीश जाेशी आदी उपस्थित हाेते.
जीएसटीचा परतावा; केंद्र कर्ज देण्यास तयार
केंद्र सरकारकडे विविध राज्यांतील जीएसटीची रक्कम थकीत असल्याच्या मुद्यावर कुळकर्णी यांना विचारणा केली असता, केंद्र सरकार जीएसटीचा परतावा कर्ज स्वरूपात देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जाची रक्कमही केंद्र सरकारच जमा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिवसेनेने ‘सीएम’कडे पाठपुरावा करावा!
पेट्राेल दरवाढीच्या मुद्यावर केंद्र सरकारकडे बाेट दाखवून आंदाेलन केल्यापेक्षा शिवसैनिकांनी राज्य सरकारने आकारलेला कर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा. तत्कालीन फडणवीस सरकारने कर कमी केल्याने त्यावेळी इंधनाचे दर कमी हाेते, असे भाजप प्रवक्ते कुळकर्णी यांनी सांगितले.
भाजप लाेकप्रतिनीधी, पदाधिकाऱ्यांची पाठ
केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी माहिती देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आयाेजित केलेल्या पत्रपरिषदेकडे भाजपचे लाेकप्रतिनिधी, मनपा पदाधिकारी व शहर कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले.