भारतीय जनता पार्टीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांची प्रदेश कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यामुळे पक्षाची धुरा नवीन जिल्हाध्यक्षाच्या खांद्यावर साेपविण्यात आली. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी किशोर मांगटे पाटील तसेच महानगर अध्यक्ष पदासाठी जयंत मसने यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बुधवारी दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश अकोल्यात धडकले.
राज्यात अडीच वर्षांची सत्ता उपभाेगलेल्या महाविकास आघाडीला सुरुंग लावून जून २०२२ मध्ये सत्तेत विराजमान झाल्यामुळे भाजपच्या जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधींना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. आगामी २०२४ मधील लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत यश संपादित करण्याच्या उद्देशातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणीत फेरबदल करीत ‘ओबीसी’चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याचे समाेर आले. आगामी निवडणुकीसाठी भाजपची यंत्रणा कामाला लागली असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या कामगिरीवर विश्वास दाखवित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सावरकर यांची पुन्हा प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली. यामुळे पक्षाने सक्षम जिल्हाध्यक्षाची निवड करण्यासाठी शाेधमाेहीम सुरु केली होती.
मागील पाच वर्षाच्या कालावधीत भाजपमध्ये विविध पक्षातील अनुभवी राजकारण्यांनी प्रवेश केला. परिणामी जिल्हाध्यक्षपदासाठी नेमकी काेणाची निवड करायची, यामुद्यावर पक्षातील स्थानिक नेतृत्वासमाेर पेच निर्माण झाला होता. अखेर यावर मार्ग काढीत भाजपचे माजी महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांना प्रमोशन देत त्यांच्याकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच महानगराध्यक्ष पदाची धुरा जयंत मसने यांच्याकडे देण्यात आली आहे.
यांच्या नावाची होती चर्चा पण...
तूर्तास राज्याच्या राजकारणात भाजपच्या विराेधात इतर राजकीय पक्षांनी थाेपटलेले दंड पाहता त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटतील हे नक्की आहे. तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष पदासाठी मनाेहरराव राहणे, गजानन उंबरकार, श्रीकृष्ण माेरखडे, अंबादास उमाळे, डाॅ.अमित कावरे यांची नावे चर्चेत होती. परंतु भाजपचे धक्कातंत्राचे राजकारण पाहता ऐनवेळेवर पक्षाने सर्वसमावेश चेहऱ्याची निवड केल्याचे समोर आले आहे.