अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या खैर मोहम्मद प्लॉट परिसरातिल शरीफ नगरमध्ये एक नाला असून या नाल्याच्या काठावर खेळत असलेला मुलगा नाल्यात वाहून गेल्याची घटना बुधवारी घडल्यानंतर या मुलाचा शोध सुरू असतानाच ७२ तासानंतर शनिवारी दुपारी मृतदेह आढळून आला.
खैर मोहम्मद प्लॉट परिसरातील जियान नामक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगा शरीफ नगर परिसरात खेळत होता. या परिसराला लागूनच एक नाला असून या नाल्यात या मुलाची चप्पल गेली. मुलाने क्षणाचाही विलंब न करता नाल्यात एक पाय टाकुन चप्पल काढण्याचा प्रयत्न करताच मुसळधार पावसाने नाल्याला असलेल्या पूरात हा दहा वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी आरडाओरोड सुरू केल्यानंतर जुने शहर पोलीस तसेच मनपाचे अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल झाले. या नाल्यात प्रचंड गाळ व कचरा असल्याने तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने या मुलाचा शोध घेण्यास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. बचाव पथकासह पोलीस व अग्निशमन दल या मुलाचा शोध घेत होते; मात्र पावसामुळे अनेक अडचणी येत असल्याने शोध घेण्यास यंत्रणा हतबल ठरत होती. अशातच शनिवारी दुपारी या मुलाचा मृतदेह नाल्याच्या काठावर एका शेतात आढळून आला त्यानंतर पोलिसांनी अमृतदेह सर्वोच्च रुग्णालयात उत्तरी तपासणीसाठी पाठविला असून त्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
नाल्यातील कचरा व गाळामुळे अडचण
ज्या नाल्यात हा मुलगा वाहून गेला त्या नाल्यात प्रचंड कचरा व गाळ असल्याने या मुलाला शोधण्यास पोलिसांना अग्निशमन यंत्रणेला व बचाव पथकाला प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. मनपाने वेळेत नालेसफाई न केल्यामुळे हा सर्व कचरा या परिसरातील नाल्यात गोळा झाला. आणि त्यामुळेच या मुलाचा शोध घेण्यास प्रचंड त्रास झाला व मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.