अकोला- कापसी येथील तलावामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून, मृतदेह हा अकोलाशिवसेना उपशहरप्रमुख भागवत अजाबराव देशमुख यांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांनी काही दिवसांआधी शिंदे गटात प्रवेश घेतला होता हे विशेष.
कापसी तलाव येथील कर्मचारी राजेश नारायण खंडारे (रा. माझोड) हे सकाळी या तलावावर गस्तीकरिता गेले असता, पाण्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह त्यांना आढळून आला होता. त्यांनी पातूर पोलिसांना माहिती दिली व या माहितीवरून पोलीस स्टेशनच्या ठाणेदार विजय नाफडे, गजानन पाचपोर, अभिजीत आसोलकर, होमगार्ड जयसिंग चव्हाण, जितेश जाधव, अमोल पोहरे, चालक सुशील वाकोडे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला.
कपडे बदलले-
पुरावा नष्ट करण्याचा हेतू गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आणि मारेकऱ्याचा शोध लागू नये, यासाठी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाचे कपडे बदलण्यात आले होते. त्यानंतर मृतदेह तलावात फेकून दिल्याची माहिती आहे. त्यामुळे अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०२, २०१ भादंविप्रमाणे पातूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता झाल्याची खदान पोलीस ठाण्यात तक्रार-
अकोला येथून भागवत देशमुख (२९), रा. वृंदावन नगर खडकी, अकोला) हे २५ तारखेपासून घरून निघून गेले. त्यानंतर घरी परतले नसल्याची तक्रार भारती श्रीकांत बोरचाटे (३६, रा. वृंदावन नगर खडकी, अकोला) यांनी दिली होती.
पातूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल-
याप्रकरणी पातूर पोलिसांत पोलीस कॉन्स्टेबल गजानन गुलाबराव पाचपोर यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय तपासणी अहवालामध्ये गळा दाबून खून झाल्याचा अहवाल मिळाला.
दोन किमीचा परिसर पिंजून काढला-
पातूरचे पोलीस ठाणेदार विजय नाफडे हर्षू रत्नपारखी, अरविंद पवार, दिलीप मोडक, गजानन पाचपोर, अभिजीत आसोलकर, वसंत राठोड यांनी दोन किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. त्यानंतर मृतदेहासंदर्भात कागदपत्रे हाती आली. पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. तपासादरम्यान कापसी तलाव येथे काट्याच्या झुडपात एक पाकीट व रुमाल मिळाला. त्यामध्ये व्यक्तीचे फोटो आणि पत्ता मिळून आल्याने मृतदेहाची ओळख पटली. मृतदेह हा अकोला शिवसेना उपशहरप्रमुख भागवत अजाबराव चव्हाण देशमुख यांचा असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली. तसेच उत्तरीय तपासणीमध्ये देशमुख यांची हत्या झाल्याचे समोर आले.