संतोष येलकरअकोला : जिल्ह्यात धार्मिक स्थळे, शहरे व ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश देत, निरंतर व सातत्यपूर्ण स्वच्छतेची ही मोहिम लोकचळवळ व्हावी, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
अयोध्या येथे येत्या २२ जानेवारी रोजी श्री राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील शहरी, तसेच ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहिम राबविण्याचे सांगत, परिसरात निर्माण होणारा कच-याची विल्हेवाट आणि ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याच्या यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देत, निरंतर स्वच्छतेसाठी प्रभावी जनजागृती करण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सुशोभीकरणाची कामे आणि मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी. गावागाव प्रभातफेरी, रांगोळ्या असे उपक्रम लोकसहभागातून राबविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.रोषणाईसाठी मंदिरांना' डीपीसी ' तून निधी द्या!
रोषणाईसाठी मंदिरांना जिल्हा नियोजन समिती ( डीपीसी) माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले.
प्रत्येक रुग्णालयात हिरकणी कक्ष उघडा!
राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विपणनासाठी व ब्रँडिगसाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे सांगत प्रत्येक रूग्णालयात हिरकणी कक्ष उघडण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मनपाच्या स्वच्छ्ता
मोहिमेचे सादरीकरण!महापालिकेतर्फे शहरातील स्वच्छता मोहिमेचे सादरीकरण आयुक्त द्विवेदी यांनी यावेळी केले. शहरात १२ एकर जागेवरील बायोमायनिंग प्रकल्पाबाबत माहिती त्यांनी दिली.वाळू डेपोचा दिला कार्यारंभ आदेश !
शासनाच्या नविन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील ३६ वाळूघाटांसाठी ११ वाळू डेपो निश्चित करण्यात आले असून त्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत मंजूर झालेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील वाळू भ डेपोसाठी सबंधित निविदाधारकास पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश यावेळी देण्यात आला.