अकोला : नागपूर-वर्धाकडून काेळसा भरून भुसावळच्या दिशेने जात असलेल्या जोड मालगाडीचे (लॉंग हॉल) डबे कपलिंग निखळल्याने इंजिनपासून वेगळे झाल्याची घटना अकोला रेल्वेस्थानक ते बिर्ला गेट परिसरादरम्यान बुधवारी (२२ मार्च) सकाळी अप लाइनवर घडली. सुदैवाने हा प्रकार लवकर लक्षात आल्याने संभाव्य दुर्धटना टळली.
मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वेस्थानकावरील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या दिशेने एक १२० डब्ब्यांची जोड मालगाडी कोळसा घेऊन भुसावळकडे निघाली होती. सकाळी ११.२३ वाजता बिर्ला गेट परिसरात या जोड मालगाडीपैकी मागच्या गाडीचे २० व २१ क्रमांकाचे डबे कपलिंग निखळल्याने आपसात धडकले. परिणामी अर्धी गाडी बिर्ला गेट जवळ तर अर्धी मालगाडी अकोला स्थानकापर्यंत येऊन पोहोचली.
हा प्रकार मालगाडीमध्ये असलेल्या गार्डच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने अकोला रेल्वेस्थानकावर संपर्क साधून माहिती दिली. रेल्वेस्थानक प्रबंधक एस. डी. कवडे यांनी तातडीने समन्वय साधत यातायात विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी वेगात हालचाली करत निखळलेल्या कपलिंग जोडल्या. तोपर्यंत पुढे निघून गेलेली अर्धी मालगाडी बिर्ला गेटपर्यंत आली व जोडणी केल्यानंतर दुपारी १२. २० वाजता पूर्ण मालगाडी भुसावळकडे रवाना करण्यात आली.
तासभर वाहतुकीचा खोळंबा
अपलाईनवर घडलेल्या या घटनेमुळे नागपूरहुन-भुसावळकडे जाणारी रेल्वे वाहतुक तासभर विस्कळीत झाली होती. सकाळी ११.२३ ते दुपारी १२.२० या वेळेत नियोजित असलेल्या अपलाईनवरील प्रवासी गाड्या आधीच उशिरा धावत असल्याने फारसा परिणाम झाला नसला, तरी काही मालगाड्या थांबवून ठेवाव्या लागल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.