अकोट: समाज जीवनाला समृद्ध करणा-या संत विचार तत्वाच्या मुळाशी जावून शोध घेणे गरजेचे आहे. संत विचाराच्या मुळ तत्वाचा शोध घेणे हा अनुभव अद्भुत आहे या संतत्वाची अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी केल्यास संत विचार सामान्य माणसांपर्यंत पोहोचविता येतो. आधुनिक काळातही संत विचार आचरणाची खरी गरज आहे. असे प्रतिपादन मुंबईचे प्रख्यात पत्रकार तथा रिंगण चे संपादक सचिन परब यांनी केले.
वारकरी संताचे चित्र ,चरित्र आणि पवित्र विचार हा महाराष्ट्राचा अनमोल ठेवा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी एका वारकरी संतावरील रिंगण चा आषाढी विशेषांक प्रकाशित होतो. यावर्षीचा संत मुक्ताबाई विशेषांकांचा प्रकाशन सोहळा श्री क्षेत्र श्रद्धासागर येथे राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे हस्ते पार पडला.यावेळी सचिन परब बोलत होते.सद्हेतूने 'रिंगण'चा १० वा संत मुक्ताबाई विशेषांक आपले हाती देतांना आनंद द्विगुणीत झाला आहे.असेही ते म्हणाले.गुरुवर्य वासुदेव महाराज वारकरी संत मालेतील अलौकिक लढवय्ये संत होते.त्यांचे दर्शनाने उर्जा मिळाली असे भावोद् गार सचिन परब यांनी यावेळी काढले.
या सुंदर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.वासुदेवराव महल्ले होते.या प्रसंगी मुख्यअतिथी म्हणून 'कैवल्य' आश्रम कसू-याचे अध्यक्ष ह.भ.प. प्रशांत महाराज ताकोते,संत मुक्ताई संस्थान मेहुणचे अध्यक्ष ह.भ.प. ,रामराव महाराज ,दर्यापूरचे प्रख्यात साहित्यिक विजय विल्हेकर उपस्थित होते.
संत विचारांना प्रदक्षणा म्हणजेच रिंगण - प्रशांत महाराज
प्रस्तापित धर्ममार्तडांच्या जोखंडातून बहुजनांना मुक्त करण्यासाठी वारकरी संतांनी विद्रोह केला.वारकरी परंपरा ही पुर्णतः विज्ञाननिष्ठ आहे. ही विचारधारा ख-या अर्थाने समाजाचे पोषण करते.संतांच्या मुळ विचारांचे संशोधनात्मक अभ्यासातून प्रगटलेले निरिक्षणं अंगीकारणे नितांत गरजेचे आहे.संत तत्वज्ञानाला प्रदक्षणा घालणे हेच खरे रिंगण आहे.असे उद्बोधक विचार प्रशांत महाराजांनी यावेळी बोलतांना मांडले. "महाराष्ट्रातील सांस्कृतिक व सामाजिक लोकयात्रेचे रिंगण" या विषयावर अभ्यासपूर्ण मनोगत त्यांनी मांडलेत. तर सत्यपाल महाराज यांनी आपल्या अस्सल शैलित संत साहित्याचे वाचन,मनन चिंतन करुन समृद्ध व्हा असा हितोपदेश केला.ज्ञानाविना काहीच पवित्र नाही .असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विजय विल्हेकर यांनी रिंगण विशेषांकाचे महत्व सांगतांना सचिन परबांच्या धडपडीचे मुक्तकंठाने कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात वासुदेवराव महल्ले यांनी गुरुवर्य वासुदेव महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव रविंद्र वानखडे यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष पुरुषोत्तम लाजूरकर,विश्वस्त दादाराव पुंडेकर,महादेवराव ठाकरे,अशोकराव पाचडे,गजाननराव दुधाट,कानुसेठ राठी,मध्यस्थी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब फोकमारे,कोषाध्यक्ष जयकृष्ण वाकोडे, डॉ.सुहास कुलट, डॉ. नरेंद्र टापरे,माधवराव मोहोकार, अंबादास महाराज,नागोराव वानखडे,मधुकरराव पुंडकर, वसंतराव पागृत,बंडु कुलट, गजानन महल्ले,धनंजय वाघ,गजानन वालसिगे,जिल्हा बँकेचे शाखाधिकारी आशिष घोम,सौ वृंदाताई मंगळे,मस्करे साहेब,डॉ मुकेश टापरे,मंगेश मोरे,सतीश देशमुख,ऋषीपाल महाराज, पवनपाल महाराज आदींसह रसिक श्रोत्रे व भक्तगण उपस्थित होते.पसायदाने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.