अकोला: नुकतेच लोकार्पण झालेल्या शहरातील उड्डाणपुलावर रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पहिली अपघाताची घटना घडली. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने, दुचाकीवर मागे बसलेला १६ वर्षीय मुलगा पुलाच्या खाली फेकला गेला. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी सोमवारी सकाळी गुन्हा दाखल केला.
शहरात नव्याने निर्माण झालेल्या उड्डाणपुलावर चांगलीच वर्दळ वाढली आहे. रविवारी रात्री उड्डाणपुलावरून अशोक वाटिकामार्गे टाॅवरकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेला वेदांत गजानन तायडे (१६, रा. एमआयडीसी क्र. ४) हा पुलावरून खाली अशोक वाटिकेजवळील रस्त्यावर फेकला गेला. गंभीर जखमी झालेल्या वेदांतचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार शिवरत्न शर्मा (३०) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर तीन महिन्यांनी पुलावर पहिला अपघात घडला. त्यात एका युवकाचा बळी गेला.
वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
उड्डाणपुलावरील वाहतुकीच्या बाबतीत शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून सातत्याने जनजागृती करण्यात येत असून, वाहनचालकांना सूचनाही देण्यात येत आहेत. तसे फलकही पुलावर लावले आहेत. परंतु काही युवक आततायी करून पुलावर भरधाव वाहने दामटतात. दुचाकीस्वारांनी उड्डाणपुलाचा वापर कमी करावा. शक्यतोवर दुचाकी वाहने शहरातूनच न्यावी. उड्डाणपुलावरून जड वाहनांसह चारचाकी वाहनांची वर्दळ वाढल्याने, वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केले आहे.