अकोला : शेतात हरभरा पिकाची राखण करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर कोल्ह्याने हल्ला केल्याची घटना शहरालगतच्या जुना हिंगणा गावात सोमवारी सकाळी ८ वाजताचे सुमारास घडली. चवताळलेल्या या कोल्ह्याने रेस्क्यू ऑपरेशनसाठी गेलेल्या मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यासह आणखी दोघांनाही चावा घेतला.
जुना हिंगणा येथील शेतकरी नाजूकराव घोरड हे सोमवारी सकाळी शेतात गेले असता, त्या ठिकाणी कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. घटनेची माहिती मिळताच मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर गेले. त्यावेळी मोर्णा नदी पात्रात शांतपणे बसलेल्या कोल्ह्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता, कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला करून चावा घेतला. त्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी ओवे यांच्या मार्गदर्शनात वनपाल गजानन इंगळे, वनरक्षक एस.एस. तायडे, एन.एम. मोरे, वन कर्मचारी गजानन म्हातारमारे, अनिल चौधरी, चालक यशपाल इंगोले यांनी घटनास्थळ गाठून कोल्ह्याला जेरबंद केले व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सुरक्षित अधिवासात सोडून दिले. दरम्यान, जखमी शेतकरी नाजूकराव घोरड व मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली.