अकोला : अहमदाबाद हावडा एक्सप्रेसने प्रवास करीत असलेल्या अकोल्यातील प्रवाशांनी ओडिसा येथील प्रवाशाची बॅग चुकीने त्यांच्यासोबत घेतल्यानंतर ही बॅग जीआरपी पोलिसांना दिली. जीआरपी पोलिसांनी बॅग मालकांचा शोध घेऊन ही बॅग प्रवाशास परत केली. बॅगमध्ये पाहणी केली असता दोन लाख १७ हजार पाचशे रुपये रोख व ७० हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे समोर आले. अकोला येथील दीपक पोपट व त्यांचे १६ जणांचे कुटुंबीय अहमदाबाद हावडा एक्सप्रेसने प्रवास करीत होते. ते अकोल्यात साहित्य घेऊन उतरले असता एका दुसऱ्या प्रवाश्याची ट्रॉलीबॅगही खाली घेऊन उतरले. त्यांच्या लक्षात आल्यानंतर यांनी ही बॅग जीआरपी पोलिसांना दिली.
जीआरपी पोलिसांनी तातडीने या बॅगच्या मालकाचा शोध सुरू केला असता ओडिसातील संबलपूर जिल्ह्यातील रहिवासी जतिन भरत पटेल यांची ती बॅग असल्याचे समोर आले. यावरून जीआरपी पोलिसांनी ओडिसा येथे संपर्क करून पटेल यांना बुधवारी अकोल्यात बोलावले. त्यानंतर ओळख पटवून ही बॅग परत केली. बॅगमध्ये सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याचे समोर आले. जीआरपी पोलिसांनी ही कामगिरी बजावल्याने दीपक पोपट व जतीन पटेल यांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.