आशिष गावंडे, अकाेला: पाटबंधारे विभागाने आखलेल्या विद्रुपा व मोर्णा नदीच्या निळ्या व लाल रंगाच्या पुर नियंत्रण रेषेला साेमवारी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगिती दिली. पाटबंधारे विभागाने निकष,नियम धाब्यावर बसवित पुर नियंत्रण रेषा आखल्यामुळे अकाेलेकरांचे माेठे नुकसान हाेणार असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पालकमंत्री पाटील यांनी पाटबंधारे विभागाला नव्याने पूरनियंत्रण रेषा आखण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
शहराचा सन २००२ मध्ये विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लान)तयार करण्यात आला हाेता. दर वीस वर्षानंतर सुधारित विकास आराखडा तयार करावा लागताे. त्यानुषंगाने महापालिकेने ‘डीपी’तयार करण्यासाठी मुंबइ येथील एमसीएमसीआर एजन्सीची नियुक्ती केली. नगररचना विभागामार्फत गठीत केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सर्वे पूर्ण केल्यानंतर आक्षेप,हरकती मागविण्यात आल्या हाेत्या. ही सर्व प्रक्रिया आटाेपल्यानंतर पाटबंधारे विभागाने माेर्णा व विद्रूपा नदीच्या पुर नियंत्रण रेषेचा आराखडा सादर न केल्यामुळे ‘डीपी’ची प्रक्रिया रखडली. मनपा प्रशासनाला या दाेन्ही नदी परिसराची वस्तुनिष्ठ माहिती मिळणे अपेक्षित हाेते. तसे न हाेता पाटबंधारे विभागाने १९९६ आणि सन २००६ मधील जुने नकाशे आणि ते सुद्धा प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याने दिले नसल्याचे समाेर आले हाेते. त्यानंतर या विभागाने दाेन्ही नद्यांचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यासाठी मनपाकडे २५ ऑगस्ट पर्यंत मुदत मागितली हाेती.
...तर एक लाख लाेकसंख्या प्रभावित
सुधारित पुर नियंत्रण रेषेमुळे असंख्य बांधकामांना बाधा पोहाेचली असून यामुळे एक लाख लाेकसंख्या प्रभावित झाल्याची बाब आ.रणधीर सावरकर यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. ही पुररेषा रद्द न केल्यास रहिवाशांसह बांधकाम व्यावसायिक, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट तसेच बँकांचे मोठे नुकसान हाेणार असल्याचे आ.सावरकर यांनी स्पष्ट केले.
शेतकरी,बांधकाम व्यावसायिक अडचणीत
पाटबंधारे विभागाने आखलेल्या निळ्या व लाल रंगाच्या पुर नियंत्रण रेषेमुळे शेतकरी तसेच बांधकाम व्यावसायिक अडचणीत आल्यामुळे रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)चे अध्यक्ष अध्यक्ष सुनिल ईंन्नाणी, सचिव दिलीप चौधरी, उपाध्यक्ष अविनाश राऊत, आर्किटेक्ट असोसिएशनचे ईश्वर आनंदानी, सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे अनुराग अग्रवाल यांनी आ.सावरकर यांची भेट घेतली. ही बाब आ.सावरकर यांनी पालकमंत्र्यांसमाेर स्पष्ट केल्यानंतर आपण तात्काळ प्रभावाने पूरनियंत्रण रेषेला स्थगिती देत असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.