राजेश शेगाेकार, लोकमत, अकोला: येथील डॉ. अंजली राजेंद्र सोनोने आणि सुरेखा दिलीप सोनोने ह्या एकाच कुटुंबातील दोन साठीतील महिलांनी जगातील अतिशय खडतर अशा एव्हरेस्ट बेस कॅम्प गिर्यारोहणाची मोहीम गुरुवार, ३ मे रोजी यशस्वीरीत्या पूर्ण करून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्यांच्यासोबत डॉ. राजेंद्र सोनोने यांनीही एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला.
सोनाने कुटुंबियांनी ही मोहीम २६ एप्रिल रोजी लुक्ला या नेपाळमधील हिमालयाच्या अत्यंत दुर्गम भागातील गावातुन सुरू केली होती. लुक्ला, फाकडींग, नामचे बजार, तेंगबोचे, देबोचे, फेरीचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरखशेप, काला पत्थर असे खडतर गिर्यारोहण मजल दरमजल करीत ३ मे रोजी ही त्रयी एव्हरेस्ट बेस कॅम्पला यशस्वीरीत्या पोहोचली. एव्हरेस्ट बेस कॅम्प हा समुद्रसपाटीपासून ५३६४ मिटर एवढ्या उंचीवर आहे जेथे वर्षभर असतो.
समुद्रसपाटीपासून वर जातो तसतशी हवा विरळ होऊन प्राणवायु चे प्रमाण खुप कमी व्हायला लागते. सोनोने कुटूंबियांनी विपरीत परिस्थितीचा सामना सतत कोसळणाऱ्या पावसात आणि सतत होणाऱ्या हिमवर्षावात, उणे २० डिग्री तापमानातही आपली मोहिम ८ दिवसांत यशस्विरित्या फत्ते केली आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प वर तिरंगा मोठ्या दिमाखात फडकवला. ही मोहिम फत्ते करण्यासाठी त्यांना मुंबई येथील डॉ. रमेश कदम, नाशिक येथील महाजन बंधू, अजिंक्य फिटनेस पार्कचे संचालक धनंजय भगत, स्वतः चे ट्रेनर अर्जुन पाटील आणि काठमांडू येथील त्यांचे मॅराथॉन मित्र श्री शेर थारू यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.