अकोला : परिवर्तनवादी विचारांचे प्रेरणास्थान असलेल्या महामानवांच्या संदर्भातील वैचारिक प्रदूषण दूर करून, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करण्याची खरी गरज आहे, असे मत महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर संभाजी भगत यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.
अकोला दौऱ्यावर आले असता, ‘लोकमत’ च्या अकोला शहर कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटप्रसंगी संपादकीय सहकाऱ्यांसमवेत संवाद साधताना ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले, महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, आदी महामानवांच्या संदर्भात होत असलेले वैचारिक प्रदूषण दूर होणे गरजेचे असून, शेतकरी, महिला, बेरोजगार तरुण आणि सर्वसामान्यांच्या अडचणी आणि प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या कामाकडे लक्ष देण्याची आजच्या घडीला खरी आवश्यकता असल्याचे शाहीर भगत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार अमोल मिटकरी, शेतकरी जागर मंचचे जिल्हा संयोजक प्रशांत गावंडे उपस्थित होते. लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, युनिट हेड आलोक कुमार शर्मा यांनी शाहीर संभाजी भगत यांचे स्वागत केले.
कुंपणे तोडण्याची गरज
संकुचित वृत्तीची अडचण आणि जाती व धर्माची कुंपणे लावण्यात आल्याने महामानवांच्या विचारांना पाहिजे तसे व्यापक स्वरूप येऊ शकले नाही. त्यामुळे कुंपणे तोडून महापुरुषांच्या विचारांना व्यापक स्वरूप देण्याचे काम करण्याची गरज आहे. या जाणिवेतूनच शाहिरीच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पहाडी आवाजाने जागले रोमांच
शाहीर भगत यांनी यावेळी आपल्या पहाडी आवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘राजे जी जी जी...’ हा पोवाडा सादर केला. आंबेडकरी चळवळीतील महिलांचे योगदान विषद करताना ‘ माझा भीम मले सांगतो काही, मले भेटतो बाई...’ असे गीत सादर केले. महिलांवरील अन्याय आणि अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘घ्या कळ्यांची काळजी, आले आले गारदी...’ असे प्रेरणादायी गीतही शाहीर भगत यांनी सादर केले. खास आग्रहावरुन ‘ हिटलर के साथी, जनाजो के बाराती, पुछते नही इन्सा को पुछते धर्म और जाती’ हे गीत सादर करुन छोटेखानी मैफीलच रंगविली.
‘माणुसकीची’ शाळा
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्यासंदर्भात प्रबोधन करीत, लहान मुलांसह पुरुष आणि महिलांसाठी ऑनलाइन पद्धतीने ‘माणुसकीची शाळा’ सुरू केली आहे. या शाळेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती, माणुसकीची शिकवण, भारतीय संविधानाची समता, स्वातंत्र्य, बंधुभाव व न्याय ही मूलभूत तत्त्वे आदी प्रकारची शिकवण दिली जात असल्याचेही शाहीर भगत यांनी यावेळी सांगितले.