अकोला : गेल्या सव्वा वर्षापासून राज्यात सुरू असलेल्या भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा महाराष्ट्रातील जनतेला उबग आला आहे, असा आरोप करीत, आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी येथे केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अकोला जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित आढावा बैठकीनंतर शहरातील जानोरकर मंगल कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात महागाई, बेरोजगारी, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण असे अनेक प्रश्न असताना, भाजपकडून सुरू असलेल्या केवळ फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला. राज्यातील या सरकारमधील मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर सर्वात जास्त अस्वस्थता भाजपच्या आमदारांमध्ये असून, शिवसेना शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची प्रतीक्षा असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव गावंडे, डाॅ. संतोष कोरपे, रमेश हिंगणकर, अॅड. सुहास तिडके, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, डाॅ.आशा मिरगे, दिलीप आसरे आदी उपस्थित होते.
कायदेशीररीत्या शरद पवारच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना विचारात घेता, कायदेशीररीत्या शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच आहेत. असे सांगत अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी असल्याचा दावादेखील देशमुख यांनी यावेळी केला.