सचिन राऊत, अकोला: गांधी राेडवरील चाैपाटीनजीक असलेल्या महापालिकेच्या उर्दु माध्यमाच्या शाळेतील तीन चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न करीत असलेल्या महिलेस मनपा शाळेतील शिक्षकांच्या सतर्कतेने बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. या महिलेला सिटी काेतवाली पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा तपास पाेलिसांनी गतीने सुरु केला आहे. घटनास्थळावर नागरिकांसह विद्यार्थ्यांच्या जमाव जमला हाेता.
गांधी रोडच्या चौपाटी संकुलातील महापालिका उर्दू शाळा बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान आटाेपल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी परतत असतांना काला चबुतरा कॅम्पसमध्ये बुरखा घातलेल्या अज्ञात महिलेने दोन मुले व एका मुलीस अशा तीन विद्यार्थ्यांना तीच्याजवळ उभे केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या पाठीमागून येणाऱ्या शिक्षकांना महिलेवर संशय आल्याने त्यांनी महिलेवर लक्ष ठेवले. दरम्यान, याचवेळी मुलींचे पालकही मुलांना शाळेतून घरी घेउन जाण्यासाठी तिथे आले असतांनाच त्यांनाही हा प्रकार दिसला. त्यामूळे शिक्षक व महिला पालकांनी संशयीत बुरखाधारी महिलेस या संदर्भात विचारणा केली असता तीने उडवा उडवीचे उत्तर देत संताप व्यक्त केला. त्याचवेळी या सर्वांनी एकत्र येत महिलेस माेहम्मद अली राेडवरील ताजना पेठ पाेलिस चाैकी गाठत माहीती पाेलिसांना दिली.
हा प्रकार अनेकांच्या लक्षात आल्यानंतर पोलिस चौकीजवळ नागरिकांची गर्दी झाली होती. हे प्रकरण सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने सिटी कोतवाली पोलिसांनी ताजना पेठ पोलिस चौकी गाठून महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर सिटी काेतवाली पोलिसांनी संशयित महिलेशी संबंधित माहिती गोळा केली. ही महिला नजीकच्या दहीहांडा संकुलातील रहिवासी असून ती मानसिक आजारी असल्याचे पाेलिसांनी प्राथमीक दृष्टया तपास केला असता समाेर आले आहे. मात्र जिल्हयात घडत असलेल्या विविध घटनांवरून पोलीस सर्व बाजूंचा विचार करीत असून महिलेला ताब्यातच ठेवण्यात आले आहे. संशयित महिलेने स्वताच मानसिक आजारी असल्याचा दावा केल्याने तिच्या आजाराबाबतच्या कागदपत्रांची पोलिसांनी पडताळणी सुरु केली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु हाेती.