अकोला : केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीमध्ये नाफेडद्वारा हरभरा खरेदीला सुरुवात झाली असून, बुधवार, दि.१२ एप्रिलपर्यंत ७ हजार २८९ शेतकऱ्यांकडून १ लाख २६ हजार ८७२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. दरम्यान, नाफेडद्वारे नियोजन बिघडले असून, बारदान्याअभावी खरेदी रखडली आहे. खरेदी थांबल्याने हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
खासगी बाजारात भाव कमी असल्याने प्रतीक्षा असलेली हरभऱ्याची शासकीय खरेदी दि. १४ मार्चपासून सुरू झाली आहे. शासनाने यंदा ५,३३५ रुपये हमीभाव जाहीर केलेला असताना ४,३०० ते ४,६०० रूपये क्विंटलदरम्यान बाजार समित्यांमध्ये भाव मिळत आहे. हरभऱ्याला खुल्या बाजारपेठेत अद्याप हमीभाव इतका दर मिळालेला नाही. त्यामुळे हरभऱ्याच्या शासकीय खरेदीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. शेतकऱ्यांकडून नाफेडद्वारा शेतमाल खरेदी सुरू होती; मात्र आता बारदान्याअभावी खरेदी रखडली आहे.
ऐन खरीप हंगामाची तयारी तोंडावर असताना नाफेडद्वारा खरेदी थांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाफेडद्वारा नियोजन बिघडल्यानेच खरेदी रखडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी बारदाना उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र आगामी दोन-तीन दिवस बारदाना पोहोचणार नसल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. जिल्ह्यात तब्बल १८ हजारांवर शेतकऱ्यांनी नाफेडकडे ऑनलाइन नोंदणी केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील नाफेड खरेदी बंद; शेतकऱ्यांमध्ये धास्तीबुलढाणा जिल्ह्यातील नाफेडद्वारा सुरू असलेली हरभरा खरेदी अचानक बंद झाली आहे. उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगून नाफेडच्या हरभरा खरेदीचा काटा बंद करण्यात आला आहे. त्याच्या दोन दिवसांत अकोला जिल्ह्यातील खरेदीही बारदान्याअभावी रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती पसरली आहे. आगामी दोन-तीन दिवसात बारदाना पोहोचण्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे खरेदी बंद राहण्याचा अंदाज आहे.
बारदान्याअभावी जिल्ह्यातील काही केंद्रातील खरेदी रखडली आहे. आगामी दोन-तीन दिवसांत बारदाना पोहोचणार असून, त्यानंतर खरेदी सुरळीत होणार आहे.- पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अकोला.