अकोला : देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी दावे-प्रतिदावे करण्यास सुरुवात केली आहे. अशातच ‘महायुती’मध्ये असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष लोकसभेसाठी ४८ पैकी दोन जागा मागणार असल्याचे केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवार, दि.१५ जानेवारी रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेत केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री आठवले पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागांवर विजय प्राप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांना काम करावे लागणार आहे. रिपब्लिकन पक्षाला शिर्डी लोकसभा मतदारसंघासह दोन जागा मिळाव्या, यासाठी ‘महायुती’तील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही आठवले यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात पॉपुलर नेता असून, देशातील जनतेच्याही मनात आहेत. विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील, असा दावाही रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष अशोक नागदिवे, सुनील अवचार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांची!अकोला लोकसभा मतदारसंघावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया पक्ष दावा करणार नसून, या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले. तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने आरक्षणाचा विचार करावा!
महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील लढत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता त्यासाठी महाराष्ट्र सरकारने तामिळनाडूच्या धर्तीवर अभ्यास करून आरक्षणाचा विचार करावा, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.