अकोला: शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची वर्दळ असलेल्या काैलखेडस्थित हिंगणा भागात चक्क रस्त्यावर गायी,म्हशी बांधून व्यवसाय करणाऱ्या दुध व्यावसायिकाने एका शाळकरी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार खदान पाेलिसांनी दुध व्यावसायिकाविराेधात गुन्हा दाखल केला.
काैलखेड परिसरातील हिंगणा भागात शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची रेलचेल सुरु असते. रस्त्याच्या दाेन्ही बाजूने स्थानिक रहिवाशांनी माेठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. यात भरीस भर एका पशु पालकाने चक्क रस्त्यावर गायी, म्हशी बांधून बिनभाेबाट व्यवसाय सुरु केल्याचे दिसून येते. शुक्रवारी सकाळी या रस्त्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या सायकलला भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच ३० एके- १४४० क्रमांकाच्या दुचाकीचालकाने धडक दिली. या धडकेमुळे हा विद्यार्थी रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्याने त्याच्या हातापायाला दुखापती झाल्या. तसेच दुचाकीवरील दुधाची कॅन रस्त्यावर पडल्याने त्यातून काही दुधही सांडले. जखमी विद्यार्थ्याची विचारपुस करण्याऐवजी दुचाकीचालक त्रिपाठी नामक व्यक्तीने या विद्यार्थ्याला अक्षरश: तुडवणे सुरु केले. मध्यस्थ करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना देखील दुचाकीचालकाने शिवीगाळ करीत धमकावले. या घटनेची माहिती शाळेतील कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याच्या पालकास दिल्यानंतर पालक तथा फिर्यादी दिलीप जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली.
लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे नाराजी
याप्रकरणी विद्यार्थ्याचे पालक दिलीप जाधव यांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दुचाकीचालकाविरोधात तक्रार नोंदवली असता, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यादरम्यान, भाजप लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यामुळे रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली.