देशात संविधानाला गालबोट लावण्याचे काम सुरू - नाना पटोले
By रवी दामोदर | Published: April 18, 2023 04:43 PM2023-04-18T16:43:32+5:302023-04-18T16:43:45+5:30
राज्यात सरकारच नव्हे, तर सर्व व्यवस्था बेजबाबदार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
अकोला : जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जी भूमिका व्यक्त केली आहे, ती अतिशय गंभीर आहे. पुलवामा घटनेत सरकारची चूक आहे, असे मलिक सांगत असताना त्यांना गप्प राहण्यास सांगितल्या गेले. गेल्या काही दिवसांपासून संविधानाला गालबोट लावण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. राज्यात सरकारच नव्हे, तर सर्व व्यवस्था बेजबाबदार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
अकोल्यात मंगळवार, दि.१८ एप्रिल रोजी समाजभूषण बलदेवराव पाटील म्हैसने (गुरुवर्य) यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंड होते, तर प्रमुख उपस्थिती आमदार अमोल मिटकरी, आमदार धीरज लिंगाडे, आचार्य हरीभाऊ वेरुळकर गुरुजी, प्रकाश वाघ महाराज, सत्यपाल महाराज, गुलाब महाराज, बबनराव चौधरी, दाळू गुरुजी यांची होती. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे हे होते.
मंत्र्यांसाठी एसी, तर जनता उघड्यावर!
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात भल्या मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उपस्थितीसाठी देशभरातून श्री सदस्य सकाळपासूनच मैदानात आले होते. याप्रसंगी मंत्र्यांसाठी एअर कंडीशनर होते, तर जनता राजा उघड्यावर होते. कार्यक्रम सरकारचा असल्याने सरकारने योग्य नियोजन करणे गरजेचे होते, मात्र नियोजन योग्य पद्धतीचे नसल्याने उष्माघातामुळे श्री सेवकांचा मृत्यू झाला, असे मत नाना पटोले यांनी अकोल्यातील कार्यक्रमात व्यक्त केले.