अकोला : ‘जलजीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली १ हजार २८ कोटी रुपये किमतीची १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे अद्याप निम्म्यावरच आहेत. त्यामुळे रेंगाळलेली कामे पूर्ण होणार केव्हा आणि प्रत्यक्षात योजनांद्वारे ५२३ गावांतील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत दरडोई दर दिवसाला ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी संस्था आणि गुरांसाठी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ११ नवीन आणि ४ सुधारणात्मक पुनर्जोडणी अशा १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर करण्यात आली. १ हजार २८ कोटी रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या या योजनांची कामे गेल्या मे ते डिसेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आली. संबंधित योजनांची कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते; मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील या पाणीपुरवठा योजनांची कामे सरासरी ५० टक्क्यापर्यंत पोहोचली असून, उर्वरित ५० टक्के कामे अद्याप बाकी असल्याने, या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.कामे सुरू असलेल्या अशा आहेत१५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना !बाळापूर ६९ खेडी पाणीपुरवठा योजना.तेल्हारा ६९ गावे पाणीपुरवठा योजना.पोपटखेड ९७ गावे पाणीपुरवठा योजना.अकोट ८४ खेडी पाणीपुरवठा योजना.लंघापूर ५० गावे पाणीपुरवठा योजना.लाखपुरी १८ गावे पाणीपुरवठा योजना.कुरुम आणि दोन गावे पाणीपुरवठा योजना.पिंजर व दोन गावे पाणीपुरवठा योजना.धाबा आणि १३ गावे पाणीपुरवठा योजना.कान्हेरी व १० गावे पाणीपुरवठा योजना.वाडेगाव आणि २४ गावे पाणीपुरवठा योजना.खांबोरा ६० खेडी पाणीपुरवठा योजना.खांबोरा ४ खेडी पाणीपुरवठा योजना.शिरपूर आणि १२ गावे पाणीपुरवठा योजना.बागायत पातूर व २ गावे पाणीपुरवठा योजना.
जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी कुशल कारागिरांची वानवा !जिल्ह्यातील १५ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी कुशल कारागीर अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने, कुशल करागिरांची वानवा असल्याने, योजनांच्या जलकुंभ व जलशुद्धीकरण केंद्रांची कामे रेंगाळली आहेत.
‘डीआय पाइप’चा तुटवडा !प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या डीआय पाइपचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. या पाइपचा तुटवडा जाणवत असल्याने पाणीपुरवठा योजनांची रेंगाळत आहेत.