नितीन गव्हाले, अकोला: गावात वीज गेली. त्यामुळे कुटुंबातील सर्व लोक दारे सताड उघडी ठेवून झोपी गेली. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने पहाटे ३ वाजताच्या सुमारास घरात शिरून पाहुणी म्हणून आलेल्या दोघींचे रोख रकमेसह सोन्याचे ४० ग्रॅमचे दागिने लांबवल्याची घटना २५ जून रोजी तळेगाव बाजार येथे घडली. या प्रकरणात हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तळेगाव येथील पंडित महादेव खारोडे (६८) यांच्या तक्रारीनुसार, २३ जून रोजी त्यांच्या चुलत भावाच्या घरी लग्न होते. त्यामुळे मुलीसह भाची आलेली होती. २५ जून रोजी मुलगा शेतात रखवालीसाठी गेला होता. रात्री अंदाजे ११ वाजताच्या सुमारास कुटुंबातील सदस्य, पाहुणे आलेली मुलगी व भाची झोपी गेले होते. तेव्हा गावातील वीज गेल्यामुळे घराचे दरवाजे उघडे ठेवून खारोडे कुटुंबीय झोपले होते. २६ जूनला पहाटे अंदाजे ३ वाजता पंडित खारोडे यांना जोरजोराने ओरडण्याचा आवाज आल्याने ते झोपेतून उठले. तेव्हा वीज गेलेली होती. घरातील लोकांनी आवाजाचे दिशेने घराचे मागे जाऊन पाहिले असता तेथे भाची होती. तिने कोणाला तरी घरातून पळत जाताना पाहिले. त्यामुळे घरामधील सामान पाहिले असता भाचीच्या बॅगमधील रोख ५० हजार, मुलीने सज्जावर गंजाखाली झाकून ठेवलेली २२ ग्रॅमची सोन्याची पट्टापोथ, १७ ग्रॅमची सोन्याची पट्टापोथ असे एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचे दागिने दिसले नाहीत. चोरट्याने घरात शिरून दागिने लंपास केले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.