मलकापूर : अज्ञात चोरट्यांनी बँकेचे लोखंडी चॅनल गेट व दरवाजाचे कुलूप कटरच्या साह्याने कापून बँकेमध्ये प्रवेश करीत तिजोरीतील ४२ हजार ६६१ रुपये रोख रक्कम लंपास केली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास धरणगाव स्थित बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या शाखेत घडली. दरम्यान, पोलिसांनी बेवारस स्थितीतील इंडिका गाडी मलकापूर येथून ताब्यात घेतली आहे. तालुक्यातील धरणगाव येथे बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची शाखा आहे. सोमवारी रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँकेचे लोखंडी चॅनल गेट व दरवाजाचे कुलूप कटरच्या साह्याने कापल्याचे सकाळी ८ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले. याबाबत बँकेचे शाखाधिकारी अविनाश जगदाळे तसेच बँकेच्या संबंधित कर्मचार्यांना माहिती देण्यात आली. बँकेचे विभागीय अधिकारी संजय जाधव यांनी पाहणी केली असता बँकेतील लोखंडी तिजोरीतून ४२ हजार ६६१ रु. रोख रक्कम व कल्याणकारी कर्ज खात्याचे दोन सभासदांच्या पावती फाइल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी अविनाश जगदाळे यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अप नं.५१/१६ कलम ४५७,३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी चौकशी केली असता, एम.एच.२८-वाय.४५0६ या क्रमांकाची एक पांढर्या रंगाची इंडिका गाडी रात्री ११ वाजेच्या सुमारास बँकेसमोर उभी असल्याची बाब समोर आली.
जिल्हा बँकेत जबरी चोरी
By admin | Published: February 10, 2016 2:10 AM