दिग्रस बु. : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दिग्रस खुर्द येथील शेतकरी गणेश फाळके यांनी हरभऱ्याची काढणी केल्यानंतर शेतात हरभरा सुकण्यासाठी ठेवला. रात्रीच्या सुमारास सुकण्यासाठी ठेवलेल्या हरभऱ्यापैकी ६ ते ७ क्विंटल हरभरा लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणात शेतकऱ्याने पातूर पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिग्रस खु. येथील शेतकरी गणेश फाळके यांनी गट क्रमांक ६८ मधील पाच एकर शेतातील हरभऱ्याची काढणी केली. हरभरा ओलसर स्वरूपाचा असल्याने गणेश फाळके यांनी शेतातच उन्हात हरभरा सुकण्यासाठी ठेवला. रात्रीच्या सुमारास ते जेवण करण्यासाठी घरी आले असता अज्ञात चोरट्यांनी चारचाकीद्वारे सुकण्यासाठी ठेवलेल्या हरभऱ्यापैकी ६ ते ७ क्विंटल हरभरा लंपास केला. शेतात गेल्यानंतर गणेश फाळके यांनी पातूर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पातूर पोलीस स्टेशन बिट जमादार अवचार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.