अकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने खेतान नगरातील रहिवासी तसेच पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पंकज पवार यांच्या निवासस्थानी घरात कुणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या ठिकाणावरून चोरट्यांनी सुवर्ण आभुषणांसह ३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी खदान पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.जुने खेतान नगर, छत्रपती उद्यानसमोरील रहिवासी भीमराव नामदेव पवार यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सामानाची नासधूस केली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील रोख २० हजार, ४० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, ३० व १५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या साखळ्या, ३ व ८ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या आंगठ्या, ५ व ७ ग्रॅम सोन्याचे कानातले, १० व ३० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र असा ३ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी श्वान पथक, आयकार (फिंगर प्रिंट एक्सपर्ट) घटनास्थळी प्राचारण करण्यात आले होते. याप्रकरणी भीमराव नामदेव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत.