लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव: येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १.७५ लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. तसेच श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत महल्ले यांची दोन मुले रवी महल्ले व राम महल्ले हे दोघेही वाडेगाव येथे परिवारासह राहतात. दिवाळीची सुटी असल्याने हे सर्व कुटुंब सोमवारी त्यांच्या मूळ गावी दिग्रस खुर्द येथे गेले होते. नंतर मंगळवारी सकाळी आल्यानंतर तळमजल्यातील दरवजाचे कुलूप तोडलेले होते. पुन्हा दुसऱ्या मजल्यावर गेल्यावर दरवाजे कुलूप अरीने कापलेले आढळून आले. त्यानंतर तिसºया मजल्यावरचे कुलूपही तोडलेले दिसून आले. घरात कपाट उघडलेले, समान अस्ताव्यस्त पडून होते. घटनेची माहिती मिळताच वाडेगाव पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक पडघन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. चोरट्यांनी १ लाख १७ हजारांचे दागिने व रोख ५४ हजार असा १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार बाळापूर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.यावेळी वाडेगाव घटनास्थळी पोलीस निरीक्षक महादेव पडघन व गुन्हे शोध पथकमध्ये कुलदीपसिंग ठाकूर, सुरेश महल्ले, दीपक कांबळे, संजय प्रांजळे, अनिल इचे, विजय गुल्हाने, आनंद गायकवाड, अतुल विजय दुतोंडे, चालक सुनील मिश्रा, श्वान जोया आदी कर्मचारी यांनी तपासणी केली. (वार्ताहर)
वाडेगावात धाडसी चोरी; १.७५ लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 10:18 AM